लातूरमध्येही भाजपची सरशी

0

लातूर : केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने आता लातूरमध्येही सरशी केली आहे. लातूर लातूरच्या महापौरपदी भाजपचे सुरेश पवार आणि उपमहापौरपदी देविदास काळे यांची सोमवारी निवड झाली.

लातूर महानगरपालिकेत भाजपचे 36 आणि काँग्रेसचे 33 नगरसेवक आहेत. दोन्ही पक्षांच्या सदस्यसंख्येत केवळ तीन जागांचा फरक असल्याने महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल, याबाबत तर्क लढवले जात होते. भाजप आणि काँग्रेसच्या गोटातही धास्तीचे वातावरण होते. भाजपने या दोन्ही पदांसाठी चार उमेदवारांचे अर्ज भरले होते. त्यामुळेही नेमकी कोणाची वर्णी लागणार, अशी चर्चा लातूरमध्ये रंगली होती. तर दुसरीकडे काँग्रेसने महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज भरला होता.

महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाने शोभा पाटील, सुरेश पवार, देविदास काळे, शैलेश गोजमगुंडे या चौघांचेही उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उपमहापौरपदासाठीही याच चौघांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अखेर सुरेश पवार यांची महापौरपदी, तर देविदास काळे यांची उपमहापौरपदी निवड झाली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली.

लातूर पालिकेच्या स्थापनेपासून 1995 चा अपवाद वगळता काँग्रेसचेच वर्चस्व होते. मात्र राज्यात सत्ता गाजवत असलेल्या भाजपने सर्वांनाच मात देत अखेर लातूरमध्येही सत्ता मिळवली आहे.