मुंबई – लातूरमधली देशमुखी मोडून काढत भारतीय जनता पार्टीने तेथे एकहाती सत्ता मिळवतानाच चंद्रपूरमध्येही कमळ फुलवले. परभणी महापालिकेत मात्र काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड देत सत्तेचा उंबरठा गाठला आहे.
या तीनही महापालिकांसाठी बुधवारी मतदान झाले होते. आज त्यांची मतमोजणी झाली. लातूरमध्ये एकूण ७० जागांपैकी भाजपाने ३६ जागा जिंकल्या. काँग्रेसला ३३ तर राष्ट्रवादी काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टीला तेथे भोपळाही फोडता आला नाही. लातूर हा काँग्रेसचा अनेक वर्षांपासूनचा गड होता. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व नंतर त्यांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख यांचे वर्चस्व येथे होते. ही देशमुखी मोडत काढत भाजपाने लातूर जिल्हा परिषदेपाठोपाठ महापालिकाही जिंकली. कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाने हा विजय मिळवला.
परभणीत राष्ट्रवादीला धक्का
परभणीत एकूण ६५ जागांपैकी ३१ जागा जिंकत काँग्रेसने राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला. परभणीत काँग्रेसचा एकही आमदार नाही. याऊलट राष्ट्रवादीचे तीन आमदार असूनही त्यांना मागच्या वेळच्या ३० जागाही राखता आल्या नाहीत. त्यांना १८ जागा मिळाल्या. भाजपाला आठ तर शिवसेनेला सहा जागा मिळाल्या. दोन जागी अपक्ष निवडून आले. मनसेला एकही जागा मिळाली नाही. मागच्या महापालिकेत भाजपाला फक्त दोन जागा जिंकता आल्या होत्या. मुस्लीम व वंझारी समाजाचे प्राबल्य असलेल्या या जिल्ह्यात काँग्रेसने महापालिकेत २३ जागांवरून ३१ जागांपर्यंत मजल मारली. लातूर व परभणीत एम.आय.एम.नेही अनेक जागा लढवल्या होत्या. पण, त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.
चंद्रपूरमध्येही भाजपा
चंद्रपूरमध्ये एकूण ६६ जागांपैकी ३६ जागा जिंकत भाजपाने सत्ता मिळवली. काँग्रेसला १२, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेला प्रत्येकी दोन तर बसपाला आठ जागा मिळाल्या. चार अपक्ष नगरसेवक निवडून आले. २०१२ साली भाजपाचे १८ नगरसेवक निवडून आले होते. पण, २०१४ साली महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला काँग्रेसच्या ११ जणांनी मतदान केले व भाजपाचा महापौर झाला. आता तर भाजपाला बहुमतच मिळाले आहे. काँग्रेस २६ जागांवरून १२ जागेपर्यंत खाली घसरली.