लातुर । जिल्ह्यात पाच दिवसात दोन आत्महत्या केल्या. पाच दिवसापुर्वी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून शेतकर्यांच्या 21 वर्षीय मुलीने आत्महत्या केली हि घटना ताजी असतांनाच मुलीच्या लग्नासाठी हुंडा व खर्चाची जमवाजमव होत नसल्याने शेतकर्याने गळफास घेवून आत्महत्या केली. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील अंबुलगा गावातील अल्प भूधारक शेतकरी शिवराज बाळूराम सूर्यवंशी (वय 45) यांनी स्वतःच्या शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन अत्महत्या केली. मुलीचे लग्न ठरल्याने तिच्या हुंडा आणि लग्नातील खर्च याचा मेळ बसत नसल्याने त्यांना काय करावे, हे सूचत नव्हते, यातूनच त्यांनी आत्महत्या केली.याबाबत औराद शा. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नापिकी, हलाखीची आर्थिक परिस्थिती
पाच दिवसापुर्वी लातूर तालुक्यातील भिसेवाघोली येथील शीतल व्यंकट वायाळ या 21 वर्षीय मुलीने सततची नापिकी, हालाखीची आर्थिक परिस्थिती आणि लग्नासाठी कर्ज मिळत नसल्यामुळे विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे गेल्यावर्षीही भिसेवाघोली येथील मोहिनी भिसे या शेतकर्याच्या मुलीनेही याच कारणासाठी आत्महत्या केली होती. मी आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली आहे. वडिलांना माझ्या लग्नासाठी कुणीही कर्ज देण्यास तयार नाही, माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरु नये, असे शीतलने पत्रात म्हटले आहे. त्यातच पुन्हा एकदा ही घटना घडली आहे.