लातूर जिल्ह्यात नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

0

लातूर : राज्यामध्ये सध्या दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. लातूर जिल्ह्यातील एका अल्पभुधारक शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील किनगावजवळील मोहगाव येथे ही घटना घडली आहे. नागनाथ शिरसाठ (वय३५वर्ष) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नागनाथ शिरसाठ यांच्याकडे तीन एकर शेती होती. मात्र दुष्काळ आणि नापिकीमुळे गेल्या दोन वर्षात शेतीतून काहीच उत्पन्न निघत नव्हते. त्यामुळे संसाराचा गाडा चालवणे कठीण झाले होते. त्यामुळे नापिकी आणि घरखर्चाला कंटाळून नागनाथ यांनी आत्महत्या केली आहे. आज सकाळी शेतातल्या हरभरा पिकाला पाणी देत असताना त्यांनी विष प्राशन केले.

नागनाथ शिरसाठ दोन वर्षापासून त्यांच्या वडिलांपासून वेगळे राहत होते. त्यांच्या पाश्चात आई-वडील,पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणाचा तपास किनगाव पोलिस करीत आहेत.