लाभार्थ्यांच्या तक्रारीवरुन स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई

0

धुळे । जिल्हा पुरवठा विभागाकडे लार्भार्थींंनी केलेल्या तक्रारींवरून जिल्ह्यातील 10 स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई जानेवारी ते ऑक्टोबर 2017 यादरम्यान करण्यात आली असून संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांकडून 52 हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी पॉस मशीनचे वाटप केल्यानंतरही अनेक दुकानांवर धान्य वितरणात गैरप्रकार सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी खजया लार्भार्थींंना धान्य वितरण केले पाहिजे; यासाठी जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकातर्फे स्वस्त धान्य दुकानदारांवर ‘वॉच’ ठेवण्यात येत असतो. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकांतर्फे नियमित किंवा थेट धडक मोहीम राबविण्याात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.

बाराशे तपासण्या
जिल्हा पुरवठा विभागातर्फे जानेवारी ते ऑक्टोबर 2017 या कालावधीत नियमित तपासणी 1 हजार 5, धडक मोहिमेंतर्गत 173 तर प्राप्त तक्रारींवरून 22 अशा एकूण 1200 तपासण्या केल्या आहेत. त्यात 73 दुकानांमध्ये किरकोळ, 20 दुकानांमध्ये मध्यम तर दोन दुकानांमध्ये गंभीर स्वरूपाचे दोष आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागातर्फे संबंधित दुकानदारांना नोटिसांद्वारे खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले होते. 2016 मध्ये जिल्हा पुरवठा विभागाने 33 दुकानांवर केलेल्या कारवाईत संबंधितांकडून 1 लाख 52 हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. तर 2016 मध्ये जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने तब्बल 1500 हून अधिक स्वस्त रेशन धान्य दुकानांमध्ये तपासण्या केल्या होत्या.

या दुकानदारांना नोटिसा
धुळे तालुक्यातील चौगाव, आंबोडे, वडणे, सैताळे, गोताणे, चौगाव, पिंप्री, भोकर, हिंगणे, मोहाडी प्र. डांगरी, नांद्रे, बल्हाणे, दापुरी, साक्री तालुक्यातील आमोडे, धाडणे, मळखेडे, दहिवेल, दहिवेल, मळगाव, जामदे, चरणमाळ, छडवेल कोर्डे, दुसाणे, जिरापूर, गंगापूर, शिरपूर तालुक्यातील वाघाडी, वरझडी, शिंगावे, अंतुर्ली, हिंगोणीपाडा, बटवापाडा, शिंगावे, वरूळ, अभाणपूर या दुकानांचा समावेश आहे.