लायन्स क्लबतर्फे आंतरशालेय एकांकिका स्पर्धा

0

पुणे । सृष्टीच्या निर्मितीपासून ते शिवशाही आणि वर्तमानातील टेक्नॉलॉजीच्या जमान्यापर्यंतच्या विविध विषयांवरे१४ शाळांनी एकांकिका सादर केल्या. लायन्स क्लब ऑफ पूना वेस्ट आयोजित आंतरशालेय एकांकिका स्पर्धा भरत नाट्यमंदिरमध्ये उत्साहात पार पडल्या.

नू.म.वि. मुलींच्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी ‘एकीचे बळ’ या एकांकिकेद्वारे शेतकर्‍यांना सक्षम होण्याचा संदेश दिला. शेतकर्‍यांच्या आयुष्यातील चढ-उतार, आत्महत्या, कर्जमाफी यांसारख्या विषयांचा एकांकिकेमध्ये सहभाग होता. या एकांकिकेचे लेखन धनश्री जोशी आणि दिग्दर्शन स्वराली जोशी, माधुरी लंबाटे यांनी केले होते.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश
कै.सौ. सुदंरबाई राठी मुलींच्या प्रशालेने ‘सृष्टीचे अंतरंग’ या एकांकिकेद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. सप्तररंग आणि सप्तसुरांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी ही एकांकिका सादर केली. या एकांकिकेचे लेखन आणि दिग्दर्शन मृणालिनी जोशी यांनी केले.

रेणुकास्वरूप शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘लढा’ या एकांकिका सादर केली. रॅगिंग विरोधात लढा देण्याचा संदेश यातून देण्यात आला होता.

५वी ते ९वीसाठी एकांकिका स्पर्धा
आहिल्यादेवी हायस्कूल, लक्ष्मणराव आपटे स्कूल, मॉडर्न हायस्कूल, वसंतराव वैद्य हायस्कूल, शिवाजी मराठा जिजामाता हायस्कूल, एंजल्स हायस्कूल, डीईएस हायस्कूल, सेवासदन इंग्रजी माध्यम, पालकर हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, नू.म.वि. मुलांची शाळा या शाळा सहभागी झाल्या. लायन्स क्लब ऑफ पूना वेस्टच्या वतीने गेली १९ वर्षे सातत्याने ५वी ते ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.