पिंपरी-चिंचवड : धकाधकीची आधुनिक जीवनशैली, दैनंदिन जीवनातील वाढता ताण-तणाव यामुळे महिलांमध्ये कर्करोगाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कर्करोगाच्या समस्येसंदर्भात जनजागृती करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासणार्या लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट 3234 डी- 2 या सेवाभावी संस्थेने चिंचवड, संभाजीनगर येथील महापालिकेच्या दवाखान्यात विनामूल्य कर्करोग तपासणी आणि निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लायन्स क्लब पुणे स्पेक्ट्रम या शाखेच्या पुढाकाराने तसेच अन्य 19 शाखांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
यांची होती उपस्थिती
या शिबिराचे उद्घाटन जिल्हा उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा लायन्स क्लब अध्यक्ष राजेंद्र गोयल, विभागीय अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी, बी. के. कपूर, शैलेश आपटे, सुदाम मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
133 महिलांचा शिबिरात सहभाग
आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप, पुणे यांच्या माध्यमातून महिलांच्या स्तन आणि गर्भाशयासंबंधित कर्करोग तपासणी शिबिर पार पडले. सुमारे 133 महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. शिबिरातील सहभागी महिलांची स्तन-गर्भाशय कर्करोग, रक्त शर्करा आणि रक्त तपासणी विनामूल्य करण्यात आली. महिलांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त करून लायन्स क्लबच्या या स्तुत्य उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले. शिबिराचे समन्वयक सुनील चेकर, लायन्स क्लब पुणे स्पेक्ट्रमचे अध्यक्ष आनंद गायकवाड यांनी शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले.