लायन्स क्लब ऑफ पुणे भोजापूर गोल्डतर्फे डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांचा केला सन्मान

0

रुग्णाबरोबर संवादाचा अभाव हेच डॉक्टरांवरील हल्ल्यांचे महत्वाचे कारण
ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्‍वनाथ सावंत यांचे मत

पिंपरीः आजकाल डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात संवाद कमी होत चालला आहे. त्यातून होणार्‍या गैरसमजातून रुग्ण आणि त्याचे नातेवाईक संतप्त होऊन डॉक्टरला मारहाण करतात. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांसाठी जास्तीतजास्त वेळ देऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, असे मत ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्‍वनाथ सावंत यांनी व्यक्त केले. लायन्स क्लब ऑफ पुणे भोजापूर गोल्डतर्फे डॉक्टर दिनानिमित्त डॉ. विश्‍वनाथ सावंत आणि मधूमेह तज्ज्ञ डॉ. अनू गायकवाड यांना लायन्स क्लबचे उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राजेंद्र गोयल, पत्रकार अनिल कातळे, पुणे-भोजापूर गोल्ड लायन्स क्लबचे अध्यक्ष सुदाम भोरे, श्रीकृष्ण अत्तारकर, मुरलीधर साठे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले आदी उपस्थित होते.

उपचारासंदर्भात माहिती दिली पाहिजे
डॉ. सावंत पुढे म्हणाले की, डॉक्टर रुग्णांशी स्पष्टपणे चर्चा करीत नाहीत. रुग्णावर केले जाणारे उपचार, शस्त्रक्रियेबाबतची माहिती, त्यावर केला जाणारा खर्च याबाबतची माहिती रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना दिली जात नाही. बर्‍याचदा रुग्णाला परिचारीका किंवा सहाय्यक डॉक्टरच्या भरवशावर सोडले जाते. उपचारांचा रुग्णावर होणार परिणाम, तो पूर्णपणे कधी बरा होईल हे स्पष्टपणे सांगितले जात नाही. बिले जास्त रकमेची बनवली जातात. या सर्व गोष्टींमुळे रुग्णांमध्ये डॉक्टरांच्या बाबत नाराजी निर्माण होऊन त्यातून हल्ले होतात. त्यासाठी उपचाराची बिले योग्य रकमेची केली पाहिजेत. उपचाराच्या खर्चाची पूर्वकल्पना दिल्यास रुग्णाच्या नातेवाइकांना उपचाराचा खर्च स्वतःच्या खिशातून करायचा की हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून करायचा याचा विचार करता येतो.

डॉक्टरांना असतात मर्यादा
पत्रकार अनिल कातळे म्हणाले की, डॉक्टरांवरील हल्ले हा चिंतेचा आणि गंभीर प्रश्‍न समाजासमोर उभा आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आजाराला आणि मृत्यूला वय राहिलेले नाही. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात झालेला बदल यामुळे कोणत्याही वयात आता कोणताही आजार होऊ शकतो. डॉक्टर शेवटपर्यंत प्रयत्न करत असतात. डॉक्टरकडे समाज देव म्हणूनच पाहत असतो. कोणा एका व्यक्तीचे पाच मिनिटात शंभर टक्के खरे अचूक वैद्यकीय निदान करणारे यंत्र अस्तित्वात नाही. मात्र अनुभव, कौशल्य आणि तर्काप्रमाणे वापर करून एखादी गोष्ट घडण्याआधी त्याबद्दल उपाययोजना करणार्‍या डॉक्टरांना देखील काही मर्यादा असतात. म्हणूनच रुग्णांनी डॉक्टरांना देव किंवा गुन्हेगार मानू नये.

गरज असेल तिथे लायन्स क्लब
उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांनी लायन्स क्लब करीत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. ते म्हणाले की, समाजाला जिथे जिथे मदतीची गरज आहे तिथे आम्ही पोचण्याचा प्रयत्न करतो. जीवनाचा समतोल कसा राखता येईल यासाठी आम्ही काम करीत असतो. मधुमेह, बालवयातील कर्करोग, पर्यावरण समतोल, भुकेल्याला अन्न देणे हे आमची प्रमुख उद्दिष्टे आहेत. डायबिटिक पार्क उभारण्याची संकल्पना आहे. डॉ. अनू गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित डॉक्टरांचा फुलांचे रोप आणि पुस्तक देऊन विशेष सन्मान करण्यात आला. मानपत्राचे वाचन रोहिदास आल्हाट आणि मुरलीधर साठे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदाम भोरे यांनी केले. सूत्रसंचालन कवी राजेंद्र वाघ यांनी तर आभार श्रीकृष्ण अत्तारकर यांनी केले.