लायन्स पॉइंटला रेलिंगचे कठाड्यांची सुरक्षा

0

लोणावळा – पावसाळा सुरू झाला की नागरिकांना पर्यटकाचे वेध लागतात. महाराष्ट्रात लोणावळा हे ठिकाण पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध असल्याने याठिकाणी पावसाळ्यात बरीच गर्दी दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने लायन्स पॉइंन्टला लोखंडी रेलिंगचे कठाडे बसवण्यात असल्याची माहिती वन निरीक्षक वैभव बाबर यांनी दिली.

लायन्स पॉइंट, मोराडी शिखर, शिवलिंग पॉइंट ते टायगरस लिप हा सर्व परिसर म्हणजे पर्यटकांसाठी नंदनवन आहे. या परिसरातील निर्सगरम्य, डोंगर दर्यांमधून ऊन्हाळ्यात सुध्दा दिसणारी धुक्याची चादर, कोकण परिसराचे विहंगम दृष्य मनाला प्रसन्न करते. लायन्स पॉइंटचा हा परिसर वन विभागाच्या अखत्यारित असून तो हातवण व कुरवंडे गावांच्या सीमेवर असल्याने त्याचा हवा तसा विकास तेथे झालेला नाही. पर्यटकांचे आकर्षण केंद्र असून देखील शहरापासून दूर असलेला हा भाग पर्यटन विकासापासून कायम वंचित राहिला होता. मागील काही वर्षापासून हे ठिकाण नाईट लाईफचे ठिकाण बनले होते. पुणे व मुंबईकर तरुण तरुणी व हाय प्रोफाईल मंडळींची रात्र जागविण्यासाठी या ठिकाणी वाढलेली वर्दळ व सोबत मद्य व अंमली पदार्थांचा वापर यामुळे लायन्स पॉइंट म्हणजे मद्यपींचा अड्डा अशी या ठिकाणाची ओळख झाली आहे. लायन्स पॉइंटची नाईट लाईफ व येथे होणारी अंमली पदार्थांची होणारी विक्री हा विषय अनेकांनी लावून धरला होता. पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी वारंवार रात्री अपरात्री धाडी ठाकत कारवाई केली, अनेकांवर गुन्हे दाखल झाले.

पार्किंगची व्यवस्थाही मिळणार
वन विभागानेसुद्धा गैरप्रकार रोखण्यासाठी लायन्स पॉइंट परिसराला दगडाची सुरक्षा भिंत बांधत लोखंडी गेट बसविले. तसेच सायंकाळी सातनंतर पॉइंट पर्यटकांसाठी बंद केला. मात्र, स्थानिकांना रोजगार मिळावा याकरिता वन विभागाने काही दुकाने देखील बनवून ती स्थानिकांना दिली आहेत. पॉइंट परिसराची देखभाल व दुरुस्ती कामाकरिता संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सशुल्क पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

पर्यटकांच्या सोईसाठी फिरते शौचालय
येत्या महिनाभरात पाँईटवर पर्यटकांच्या सुविधेकरिता फिरते शौचालय लावण्यात येणार आहे. भिमाशंकरच्या धर्तीवर पॉइंटवर लाकडी पँगोड उभारण्यात आला आहे. याठिकाणी बसून विश्रांतीसोबत निर्सगाचा आनंद देखिल पर्यटकांना घेता येणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेकरिता संपुर्ण पॉइंटला दरीच्या बाजूने लोखंडी रेलिंग करण्यात आलेले आहे. तसेच भविष्यात लायन्स पॉइंटवर नवनवीन सुविधा उपलब्ध करुन येथील पर्यटन वाढीसाठी वन व्यवस्थापनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.