लालपरीचही पालटलं रुपड; आता मिळणार हायटेक सुविधा

0

यावल । प्रवासी हिताय, प्रवासी सुखाय या ब्रीदाला अनुसरून यावल आगाराने यशस्वी घोडदौड करीत प्रवाशांच्या सेवेसाठी आता बसेसमध्ये इंटरनेट सेवा पुरवण्यास प्रारंभ केल्याने प्रवासी सुखावले आहेत. आगारातील सर्व 77 बसेस मध्ये टप्प्या-टप्प्याने वायफाय जोडणीस शनिवारी सुरुवात झाल्याने खर्‍या अर्थाने आता ‘लालपरी’ हायटेक झाली, असा सूर प्रवाशांच्या तोंडून उमटला.

मोफत इंटरनेट सुविधा मिळणार
यावल एस.टी. आगाराने आता स्पर्धात्मक पध्दतीनेे प्रवाशांना आपल्या कडे ओढत व्यवसायात वाढ करण्याच्या दृष्टीने आता पावले उचलली आहेे. यात आगारात असलेल्या एकुण 77 एसटी बसेसमधून प्रवाशांना मोफत इंटरनेट वायफायच्या साह्याने देण्यास सुरवात केली आहे. करून अधिकाधिक प्रवासी एसटीकडे वळतील, अशी अपेक्षा आहे.

1 कोटी 77 लाख 57 हजारांचा व्यवसाय
आगारातुन दैनदिनी लांब पल्ल्याच्या आठ व ग्रामीण आणि जिल्ह्यांतर्गत 213 अशा तब्बल 221 फेर्‍या या 77 बसेसच्या असतात व दर रोज तब्बल 25 हजार किमी अंतर या फेर्‍यांमधून पार केलेे जाते तेव्हा नाशिक विभागीय स्तरावर यावल आगार उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीवर असून गेल्या ऑगस्ट महिन्यात आगाराने तब्बल 1 कोटी 77 लाख 57 हजारांचा व्यवसाय केला.

यांची होती उपस्थिती
तेव्हा व्यवसायात अधिक भर पडावी व प्रवाशांना बसमध्ये इंटरनेट सेवा मोफत दिल्यास प्रवासी एसटीकडे ओढला जावा, अशा उद्देशाने शनिवारी एसटी बसमध्ये आगार व्यवस्थापक डी.जी. बंजारा, सहायक कार्यशाळा अधीक्षक एस.व्ही.भालेराव, स्थानक प्रमुख जी.पी.जंजाळ, वाहतूक निरीक्षक एस.जे.अडकमोल, सहायक वाहतूक निरीक्षक सुनील चौधरी, डी. बी. महाजन, वाहतूक नियंत्रक एस. व्ही. मोरे यांच्या उपस्थितीत एसटी बसमध्ये वायफाय जोडणीस सुरुवात करण्यात आली.