‘लालपरीची’ चाके थांबली : भुसावळ विभागात प्रवाशांचे हाल
भुसावळात प्रति दिन सहा लाखांच्या उत्पन्नावर पाणी तर विभागातही लाखोंचा फटका : खाजगी अवैध वाहतूकदारांची ‘चांदी’
भुसावळ : राज्य परीवहन महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करून, कर्मचार्यांना राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणे सोई, सवलती, वेतन, भत्ते नियमाप्रमाणे लागू करण्यात यावे, या मागणीसाठी एस.टी.कर्मचार्यांनी संपाची हाक दिली आहे. विभागात काही ठिकाणी शनिवारी दुपारनंतर तर भुसावळात रविवारपासून कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे एस.टी.ची वाहतूक ठप्प झाली आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणवल्या जाणार्या लालपरीची चाके थांबल्याने सोमवारी आबालवृद्ध प्रवाशांचे चांगलेच हाल झाले तर दुसरीकडे अवैध वाहतुकीला मात्र चांगलाच ऊत आलेला दिसून आला.
भुसावळात प्रवाशांचे हाल
राज्य परीवहन महामंडळ व कर्मचार्यांना शासकीय सेवेत विलीनीकरण होण्याची मागणी पूर्णत्वास नेण्यासांठी कर्मचार्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. संपात कोणत्यांही संघटनेचा संबंध नसून एक कर्मचारी म्हणून आम्ही सर्व कर्मचारी संपात सहभागी झालो असल्याचे कर्मचारी सांगत आहे. कर्मचार्यांनी मागण्यांचे निवेदन आगार प्रमुख पी.बी.चौधरी यांना दिले आहे. सोमवारी कर्मचार्यांनी आगाराच्या प्रवेशद्वारात एकत्र येत घोषणाबाजी केली. सोमवारी एकही बस आगाराच्या बाहेर पडली नाही, बसस्थानकावर सुध्दा एकही कर्मचारी नव्हता मात्र संगणकीय उद्घोषणा मात्र सुरू होती. कंट्रोल कॅबीनला कुलूप लावलेले होते. बसस्थानकाच्या बाहेर मारोती ओमनी कार चालकांनी गाडीवरच थेट दर पत्रक लावलेले दिसून आले.
संपामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल
अनेक प्रवाशांना एस.टी.च्या संपाची कल्पना न आल्याने त्यांनी बसस्थानक गाठले मात्र संप सुरू असल्याचे कळाल्यावर अनेकांनी आल्या पावली घर गाठले तर लांबवरून प्रवास करीत येत असलेल्या प्रवाशांना मात्र बसस्थानकात काही वेळ आश्रय घेतल्यानंतर त्यांनी खाजगी वाहतूकदारांचा शोध सुरू केला. सोमवारी सकाळी भोईसर-भुसावळ आणि औरंगाबाद-यावल या दोन बस परतीच्या प्रवासात आल्या.
45 बसेसची चाके थांबली
भुसावळ आगारातील 45 बसेस असून त्या आगारात लावल्या आल्या आहेत. प्रति दिन एसटीचे सहा लाखांचे उत्पन्न बुडत असल्याचे सूत्रांनी सांगितले. भुसावळ आगारातून बसच्या 174 फेर्या होतात तर अन्य आगारातील बसच्या मिळून एक हजार फेर्या होतात. यामुळे सकाळी सहापासून ते रात्री 10 पर्यत बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते.