लालबागच्या राजाच्या दान पेटीत सापडल्या जुन्या नोटा

0

मुंबई । नोटाबंदीला येत्या नोव्हेंबरमध्ये वर्ष पूर्ण होत आहे. मात्र अजूनही लोकांकडे पाचशे-हजाराच्या नोटा असल्याचे समोर आले आहे. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या दानपेटीत भाविकांनी दान स्वरूपात थेट जुना नोटा टाकल्याचे समोर आले आहे. तासंतास दर्शनासाठी लोकांनी थेट रांगेत उभे राहून लालबागच्या राजाला फसवल्याचे उघड झाले आहे. कारण लालबागच्या राजा गणपतीच्या दानपेटीत, चलनातून रद्द झालेल्या हजाराच्या 110 जुन्या नोटा सापडल्या आहेत. या नोटांचे मूल्य तब्बल 1 लाख 10 हजार रुपये आहे.

दानपेटीत 5 कोटी 80 लाखांची रोकड
25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या गणेशोत्सवा दरम्यान लालबागच्या राजाच्या दानपेटीत तब्बल 5 कोटी 80 लाखांची रोकड जमा झाली आहे. त्यापैकी 1 लाख 10 हजार जुन्या हजारांच्या नोटांच्या स्वरुपात आहेत. यंदा लालबागच्या दानपेटीत 5 कोटी 80 लाखांची रोकड जमा झाली असली तरी ती गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. गेल्यावर्षी ही रक्कम तब्बल 8 कोटी होती. यंदा 29 ऑगस्टला पडलेल्या मुसळधार पावसामुळे भाविकांनी घरी राहणे पसंत केले, त्यामुळे यंदा रोख रक्कम कमी जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच
नोटाबंदीचाही परिणाम झाल्याचा अंदाज आहे.