मुंबई । लालबाग येथील जाम मिलच्या गाळे एनटीसीद्वारे रिक्त करण्याच्या निर्णयाला केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांची स्थगिती दिली आहे. जाम मिल येथील दुकानांना एनटीसीद्वारे गाळे रिक्त करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या नोटीसच्या संदर्भामध्ये भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली व्यापार्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांची दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. व्यापार्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर अखेर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी निर्णयास स्थगिती देण्याचे निर्देश दिले. एनटीसीने गाळेधारकांना पीपी नुसार नोटीस बजावली होती व हे भाडे न भरल्यास गाळे रिक्त करण्याची सूचना देण्यात आली होती. चर्चेदरम्यान या गाळेधारकांचा व्यवसाय अतिशय छोट्या स्वरूपाचा असून एनटीसीने आकारलेले अवाजवी भाडे भरणे त्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले. व्यापार्यांकडील परवाने 1927, 1935 या काळातील आहेत. अदमासे 80 वर्षे ते गाळेधारक असून त्यांच्याकडे 1935 चे परवाने आहेत. एनटीसीच्या स्थापनेपूर्वीपासून त्यांचे छोटे उद्योग आहेत, याचा सहानुभूती पूर्वक विचार करावा, असे आवाहन या वेळी खासदार गोपाळ शेट्टी व खासदार अरविंद सावंत यांनी केले तसेच गिरण्यांसंबंधित राज्य सरकारने पुनर्विकासाचा विचार आणला, त्यामध्ये गिरण्यांच्या चाळीतील रहिवासी अथवा दुकानदार यांना रिक्त करू नये, असे नजरेस आणले.
एनटीसीच्या इतर मिलसंदर्भामध्ये एनटीसीचे धोरण ठरवावे
जाम मिलमधील गाळेधारकांच्या समस्येसंदर्भात झालेल्या बैठकीस केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार अरविंद सावत, एनटीसी एमडी श्रीनिवासन, वस्त्रोद्योग मंत्रालय सहसचिव सरण, जाम मिलमधील रहिवासी, व व्यापार्यांचे शिष्टमंडळ आदी उपस्थित होते. जाम मिल तसेच एनटीसीच्या इतर मिलसंदर्भामध्ये एनटीसीचे धोरण ठरवावे व यावरती कायमस्वरूपी उपाययोजना केली जावी, अशी विनंती खासदार शेट्टी व खासदार सावंत यांनी केली. मंत्री स्मृती इराणी यांनी नियमानुसार शक्य तेवढे सहकार्य सहानुभूतीपूर्वक केले जाईल, असे आश्वासन दिले तसेच संबंधित अधिकार्यांना एनटीसीनिर्मिती वेळेस झालेल्या सामंजस्य करार व या गाळेधारकांचे परवाने यांचा सखोल अभ्यास करून नियमानुसार या समस्येवरती काय तोडगा काढला जाऊ शकतो.
स्मृती इराणी यांना विनंती
अहवाल मी एनटीसी बोर्डाकडे पाठवेन, त्यानंतर अहवालास अनुसरून एनटीसी बोर्ड निर्णय घेईल, असे मंत्र्यांनी आश्वासित केले, तरी तोपर्यंत कुठलीही कारवाई जाम मिलमधील गाळेधारकांवर करू नये, अशी विनंती खासदार गोपाळ शेट्टी व खासदार अरविंद सावंत यांनी मंत्री स्मृती इराणी यांना केली व ती त्यांनी मान्य केली आहे. गोपाळ शेट्टी हे मुंबईत ज्या ठिकाणी अन्याय होतो, तेथे धावून जातात. त्यामुळेच आम्हा गाळेधारकांना न्याय मिळाला. तसाच अनुभव या वेळी आल्याची माहिती या गाळेधारकांनी दिली. त्यामुळेच आम्हा गाळेधारकांना न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.