रांची । बिहारच्या चारा घोटाळ्याशी निगडित देवघर ट्रेझरी प्रकरणात गुरूवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाद्वारे शिक्षेची घोषणा होऊ शकते. या प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासह 16 आरोपींना 23 डिसेंबर रोजी दोषी ठरवण्यात आले आहे. लालू सद्या रांची मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांच्यावर चारा घोटाळ्याशी निगडित 7 खटल्यांची नोंद आहे. यापैकी चाईबासा ट्रेझरी खटल्यात त्यांना 5 वर्षांची शिक्षा झालेली आहे. तथापि, या खटल्यात त्यांनी सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता. बाकी 5 खटल्यांवर सुनावणी सुरू आहे. 950 कोटींच्या चारा घोटाळ्यात हा 33वा आणि लालूंशी संबंधित दुसरा निर्णय आहे.
10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते
बिहार सरकारने 1991 ते 1994 दरम्यान जनावरांना औषधी आणि चारा खरेदी करण्यासाठी फक्त 4 लाख 7 हजार रुपयेच मंजूर केले होते. तर यादरम्यान देवघर ट्रेझरीमधून 6 बनावट अलॉटमेंट लेटरच्या साहाय्याने 89 लाख 4 हजार 413 रुपये काढण्यात आले. दुसरीकडे, सीबीआय अधिकार्याच्या मते, या खटल्यात लालू यांना कलम 409 अंतर्गत 10 वर्षांपर्यंत शिक्षा आणि कलम 467 अंतर्गत जन्मठेपही होऊ शकते. तथापि, लालू यांच्या वकिलांनी ही शक्यता फेटाळून लावली.