रांची : वृत्तसंस्था : चारा घोटाळा प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासंबंधीची अंतिम सुनावणी आता शुक्रवारी करण्यात येणार असल्याची घोषणा सीबीआयच्या विशेष न्यायालयाने केली. त्यामुळे लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या अन्य साथीदारांना उद्यापर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे आता लालूंच्या शिक्षेसाठी ‘तारीख पे तारीख’ न्यायालय देत असल्याचे म्हटले जात आहे.
शिक्षेकडे सर्वांचे लक्ष
परवादेखील न्यायालयाने कालची अंतिम तारीख दिली होती. मात्र गुरुवारी न्यायालयाने पुन्हा एकदा उद्यावर हे प्रकरण ढकलेले आहे. त्यामुळे चारा घोटाळ्यात अडकलेल्या लालूंच्या प्रकरणावर आता कधी सुनावणी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बिहारमध्ये झालेल्या चारा घोटाळाप्रकरणी गेल्या 23 तारखेला न्यायालयाने लालू आणि त्यांच्या सर्व साथीदारांना दोषी ठरवत, शिक्षेसाठी पात्र ठरवले. यानंतर यासंबंधीची अंतिम सुनावणी गुरुवारी करणार असल्याचे सांगितले होते. परंतु, न्यायालयाने या सुनावणीला शुक्रवारपर्यंत विराम दिला आहे.