नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या 22 ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले असून मंगळवारी सकाळी 8.30 पासून आयकर विभागाने या कारवाईला सुरवात केली. 1000 कोटींच्या बेनामी संपत्तीप्रकरणी आयकर विभागाने लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित दिल्ली आणि गुडगावमधील 22 ठिकाणांवर छापे मारले. तसेच खासदार प्रेमचंद गुप्ता यांच्या मुलांच्या घरांवरही छापे मारण्यात आले.
रवीशंकर प्रसादांच्या मागणीची तातडीने दखल
चार दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावरील आरोपांची केंद्र सरकारने चौकशी करावी, अशी मागणी केली होती. तसेच लालूप्रसाद यांची कन्या आणि राज्यसभेच्या खासदार मिसा भारती यांनीही निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती जाहीर केली नाही, असा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात रेल्वेमंत्री असताना अनेक जमिनींचे व्यवहार झाल्याचेही आरोप त्यांनी केले होते.
भाजपने केला होता आरोप
लालूप्रसाद आणि त्यांच्या मुलांचा बेनामी संपत्ती प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप भाजपने काही दिवसापूर्वीच केला होता. त्यानंतर आयकर विभागाने तातडीने ही कारवाई केल्याने या कारवाई पाठीमागे भाजपचा हात असून सुडाच्या राजाकरणातून ही छापेमारी झाल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून येत आहेत.