नवी दिल्ली । चारा घोटाळ्यात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला असतानाच आता भाजपानेही त्यांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने लालूंची साथ सोडल्यास नितीश कुमारांना समर्थन देण्याची तयारी दर्शवली आहे. जर नितीश कुमारांनी लालूप्रसाद यादव यांची साथ सोडली तर भाजप नितीश कुमारांना समर्थन देण्याचा विचार करेल, असे वक्तव्य भाजपचे बिहारमधील वजनदार नेते सुशील मोदींनी केले आहे.
चारा घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांना झटका दिल्यानंतर सुशील मोदींनी हे वक्तव्य केल्याने त्याला राजकीय वर्तुळात महत्त्व प्राप्त झाले आहे. लालूप्रसाद यादव यांच्यावरील गुन्हेगारी कारस्थान रचल्याच्या आरोपांवरून पुन्हा खटला चालवण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यानंतर लागलीच सुशील मोदींनी नितीश कुमारांना ही ऑफर देऊन टाकली आहे. नितीश कुमारांनी जर लालू प्रसाद यादवांची साथ सोडली, तर त्यांच्या सरकारला समर्थन देण्याचा भाजप विचार करेल, असंही ते म्हणाले आहेत.
तसेच सुशील मोदींनी दावा केला आहे की, मुख्यमंत्री नितीश कुमार लालूप्रसाद यादवांचा फोन टॅप करत आहेत. बिहारमध्ये जेडीयू आणि आरजेडीसहित काँग्रेसच्या महाआघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं होतं. बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी नितीश-लालू एकमेकांचे शत्रू समजले जात होते. मात्र, दोन्ही पार्टींची आघाडी झाल्यानं त्यांचं सरकार आलं. लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बेनामी संपत्तीचा प्रकरणही चर्चेत आहे.