चारा घोटाळ्याच्या तिसर्या खटल्यातही दोषी
पाटणा : बहुचर्चित चारा घोटाळ्याच्या तिसर्या खटल्यातही राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तथा माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षे सश्रम कारावास व दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या शिक्षेनंतर राजदमध्ये सन्नाटा पसरला होता. लालूंसह माजी मुख्यमंत्री डॉ. जगन्नाथ मिश्रा, जगदीश शर्मा आणि आर. के. राणा यांनाही प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावास व दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. या खटल्यातील महिला आरोपी चंचला सिन्हा, निर्मला प्रसाद यांच्यासह इतर आरोपींना तीन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली असून, यातील काही आरोपींनी शिक्षा भोगली असल्याने त्यांना जामीनअर्ज जिल्हा न्यायालयात दाखल करण्याचेही निर्देश दिले आहेत.
33.68 कोटींचा पैसा हडपला!
बिहारमधील चायबासा कोषागारातून 33 कोटी 68 लाख 534 रुपयांचा निधी गैरमार्गाने काढून तो पैसा हडप केल्याच्या आरोपामध्ये रांची येथील विशेष सीबीआय न्यायालयाने लालूप्रसाद यांच्यासह एकूण 50 जणांना दोषी ठरविले आहे. या शिक्षेनंतर राजदनेते रघुवंश प्रसाद यांनी आम्ही शांत बसणार नाही, आणि उच्च न्यायालयात जाऊ, असे सांगितले. दुसरीकडे, लालूपुत्र तेजस्वी यादव यांनी केंद्र सरकार व रा. स्व. संघ यांच्यावर ताशेरे ओढत, बिहारमधील जनतेला लालूप्रसाद निर्दोष आहेत, हे माहित आहे. भाजप व संघाचा हा कुटील डाव असून, त्यांना या प्रकरणात मुद्दामहून फसविले जात आहे. या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा तेजस्वी यादव यांनी दिला. दरम्यान, लालूंना शिक्षा जाहीर होताच, पाटणास्थित राबडी निवास या लालूंच्या घरी सन्नाटा पसरला होता. माजी मुख्यमंत्री राबडीदेवी या घरीच होत्या, तर तेजस्वी यादव हे बाहेर होते. त्यांनी सकाळीच राज्यपालांची भेट घेऊन राज्यात गुन्ह्यांच्या घटना वाढल्याबाबत चिंता व्यक्त केली होती.
नीतीशकुमार व भाजप लोकसभासह बिहार विधानसभेच्या निवडणुका 2018च्या अखेरपर्यंत घेऊ इच्छित आहेत. त्यासाठीच ही सर्व तयारी सुरु आहे. कालच भूपेंद्र यादव बिहारमध्ये आले होते. आज आरएसएसप्रमुख मोहन भागतवही बिहारमध्ये फिरत आहेत. सीबीआय न्यायालयाच्या निकालाविरोधात आपण वरिष्ठ न्यायालयात जाणार आहोत.
– तेजस्वी यादव, नेते राजद