पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची झेड प्लस सुरक्षा हटविण्यात आल्यानंतर यादव यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मला काही झाले तर त्यास मोदी आणि नीतीश कुमार जबाबदार असतील. मी कुठेही जाऊ नये असे पंतप्रधानांना वाटत आहे. माझ्यावर कधीही हल्ला होऊ शकतो. नीतीश कुमारांना त्यांनी धमकावले पण, मला कुणीही धमकावू शकत नाही, अशी प्रतिक्रिया लालूप्रसाद यादव यांनी ट्वीटरवर व्यक्त केली आहे. या घटनेंतर राजकीय वादळ उठले आहे. दरम्यान, लालूंचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी या प्रकरणावरून थेट मोदींनाच धमकी दिल्याने मोठी खळबळ उडाली होती. मोदींची चामडी सोलून काढू, असे धक्कादायक विधान तेजप्रताप यांनी केले.
गुजरात निवडणुकीमुळेच सुरक्षा काढली
या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना लालूप्रसाद यादव यांनी म्हटले होते की, मी जेव्हा रेल्वेमंत्री होतो त्यावेळी गुजरातमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या इशार्यावरून माझ्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. मी गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी जाऊ नये यासाठीच माझी सुरक्षा काढण्यात आली आहे. पाटणा येथे माध्यमांशी बोलताना लालू म्हणाले, केंद्र सरकार पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारी करत असल्याने माझी सुरक्षा कमी करण्यात आली आहे का? यावेळी लालू यांनी मुलगा तेजप्रताप याची बाजू मांडण्याचाही प्रयत्न केला. माझ्या वडीलांना काही झाले तर मोदींची चामडी सोलून काढीन, अशी धमकी तेजप्रताप यादव यांनी दिली होती. जर एखाद्या मुलाला वाटते की आपल्या वडिलांच्या जीवाला धोका आहे, तर तो अशीच प्रतिक्रिया देणार, असे लालू म्हणाले.
मोदींची चामडी सोलून काढू : तेजप्रताप
लालूप्रसाद यादव यांची सुरक्षा कमी केल्यावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची चामडी सोलून काढू, अशी धमकी लालूप्रसाद यादव यांचा मुलगा आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांनी दिल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. तेजप्रताप यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रीय जनता दल आणि भाजपमधील वाद आणखी विकोपाला पोहोचण्याची शक्यता आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना तेजप्रताप म्हणाले, आम्हाला सातत्याने वेगवेगळ्या कार्यक्रमात जावे लागते. लालूजीही अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. अशात त्यांची सुरक्षा कमी केली जात आहे. लालूजींचा खून करण्याचा कट रचला जात आहे. आम्ही याचे चोख प्रत्युत्तर देऊ.
आठ व्हीव्हीआयपी नेत्यांच्या सुरक्षेत कपात
लालूंची झेड प्लस श्रेणीची सुरक्षा घटवून ती झेड करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले एनएसजी कमांडोजही परत बोलावण्यात आले आहेत. लालूंशिवाय जीतन राम मांझी, संयुक्त जनता दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांच्यासह देशातील एकूण आठ व्हीव्हीआयपी नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. याचवर्षी जुलैमध्ये केंद्र सरकारने लालूप्रसाद आणि त्यांची पत्नी राबडी देवी यांना पाटणा विमानतळावर मिळणारी विशेष सुविधा बंद केली होती.