लालूप्रसाद यादव यांना दणका; जामीन देण्यास कोर्टाचा नकार

0

नवी दिल्ली:चारा घोटाळ्याप्रकरणात दोषी आढळलेल्या लालूप्रसाद यादवांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यांना १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. गेले २४ महिन्यांपासून ते तुरुंगात आहेत.

लालू प्रसादांच्या जामिनाची मागणी करणाऱ्या अर्जाला फेटाळताना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं नमूद केले आहे की, १४ वर्षांच्या शिक्षेच्या तुलनेत तुरुंगात काढलेले २४ महिने नगण्य आहेत. विशेष म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या जामिनाची मागणी त्यांचे वकिल कपिल सिब्बल यांनी केली. सिब्बल यांनी असा युक्तिवाद केला होता की, कुठल्याही प्रकारचा मुद्देमाल हस्तगत झाला नव्हती, मुख्य गुन्हा हा फक्त कट रचल्याचा होता. खटल्याचे मूल्यमापन करण्याचे काम उच्च न्यायालयाचे आहे असे खंडपीठाने सांगितले.

विशेष म्हणजे केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने लालू प्रसादांच्या जामिनाला जोरदार विरोध केला. आजारी असलेले लालूप्रसाद यादव आता लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी तंदुरूस्त कसे झाले असा सवाल विचारत सीबीआयनं जामिन देण्यास विरोध केला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत लालू प्रसाद यादव तुरुंगातच राहतील हे स्पष्ट झाले आहे. त्यांनी केलेला गुन्हा, त्यासंदर्भातली शिक्षा आदी बाबी उच्च न्यायालय बघेल असं सर्वोच्च न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळताना स्पष्ट केलं आहे.