लालू यादव परिवाराची 175 कोटींची संपत्ती जप्त

0

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना प्राप्तिकर विभागाने जोरदार झटका दिला आहे. त्यांच्या बेनामी संपत्तीची यादीच जाहीर करत, तब्बल 175 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली. तब्बल 12 भूखंड जप्त करण्यात आले असून, जप्त करण्यात आलेल्या सर्व संपत्तीची किंमत यादव यांनी अवघी 9.32 कोटी रुपये दर्शविली होती. बेनामी संपत्ती बाळगल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने लालूप्रसाद यांच्या संपूर्ण परिवाराला कायदेशीर नोटीस बजावली आहे. दरम्यान, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने राजकीय सूडातून आपल्यावर कारवाई चालवली असल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

मुली, जावाई अन् मुलाच्या नावावर होती संपत्ती
लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी, मुलगी मिसा भारती, जावाई शैलेश भारती, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, मुलगी रागिनी यादव, चंदा यादव यांच्या नावावर ही जप्त करण्यात आलेली संपत्ती होती. या एकूण संपत्तीचे बाजारमूल्य तब्बल 175 कोटींच्या घरात आहे. तर कागदोपत्री किंमत मात्र 9.32 कोटी इतकी दाखविण्यात आलेली आहे. या संपत्तीत लालू यादव यांचे दिल्लीतील आलिशान फार्म हाऊस, न्यू फ्रेंडस कॉलनीसारख्या उच्चभ्रू परिसरातील आलिशान बंगला यांचाही समावेश आहे.

लालूपुत्रांविरुद्ध गुन्हे दाखल
प्राप्तिकर विभागाने लालूप्रसाद यादव कुटुंबीयांच्या एकूण दहा मालमत्ता जप्त केल्या आहेत. या शिवाय, तेजस्वी यादव, मिसा भारती यांच्यासह राबडी देवी यांच्याविरुद्ध बेनामी संपत्ती बाळगल्याप्रकरणी गुन्हेही दाखल केले आहेत. प्राप्तिकरच्या माहितीनुसार, सर्व प्रकारची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली असून, आणखीही काही संपत्ती असेल तर तिचा तपास प्राप्तिकर खाते घेत होते. नियमानुसार, प्राप्तिकर विभागाने यापूर्वी 50 कोटींची संपत्ती जप्त करण्याबाबत यादव परिवाराला नोटीस दिली होती. तसेच, नोटीसला उत्तर देण्यासाठी 90 दिवसांचा वेळही दिला होता. परंतु, समाधानकारक उत्तर न आल्याने ती संपत्ती प्राप्तिकर विभागाने जप्त केली होती. त्यानंतर आणखी छापेसत्र राबवून उर्वरित संपत्ती जप्त करण्यात आली आहे. एकूण 22 ठिकाणी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते.