नवी दिल्ली : अतिसंवेदनशील असलेल्या आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचा पहारा असलेल्या लाल किल्ल्यावर शस्त्रसाठा आणि स्फोटके आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर संपूर्ण किल्ला आणि परिसर सुरक्षा यंत्रणांनी पिंजून काढत तपासला. रायफल्सचे काडतूस, हातबॉम्ब, स्फोटके आणि वापरलेल्या काडतुसांच्या पुंगळ्या आदी साहित्य लाल किल्ल्यावर सफाई कामगारांना मिळून आले. या ठिकाणी ही स्फोटके आली कशी? असा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांच्या माहितीनुसार, सापडलेली स्फोटके मुदत संपलेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 जानेवारीरोजी लाल किल्ल्यावरून भाषण केले होते. त्यामुळे ही स्फोटके येथे आली कशी? यावरून सुरक्षा यंत्रणा संशयाच्या भोवर्यात सापडली आहे. राष्ट्रीय सुरक्षा पथक (एनएसजी)सह गुप्तचर यंत्रणा याबाबत कसून तपासाला लागली होती. मोदींच्या हत्येचा कट तर रचला गेला नव्हता ना? असा प्रश्न निर्माण झाला असून, यापूर्वी 22 डिसेंबर 2000 रोजी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी लाल किल्ल्यावर अंदाधुंद गोळीबार करत तीन जवानांना ठार केले होते. त्यामुळे सुरक्षेतील त्रुटीने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
एनएसजी, लष्करी अधिकार्यांकडून तपास सुरू
दिल्लीतील लाल किल्ल्यात मोठ्या संख्येने काडतुसे आणि हातबॉम्ब सापडले आहेत. सापडलेल्या सर्व काडतुसांची आणि स्फोटकांची मुदत संपलेली आहे. स्फोटके लष्कराची असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. कारण पूर्वी लाल किल्ल्यात लष्कर तैनात केले जात होते. या लष्करासाठीच हा साठा या ठिकाणी केला गेला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शस्त्रास्त्रे सापडल्यानंतर एनएसजी आणि लष्कराच्या अधिकार्यांनी तपास सुरू केला असून, एनएसजीचे बॉम्बनाशक पथक घटनास्थळी पोहोचले होते. लाल किल्ला परिसर हा संवेदनशील मानला जातो. या ठिकाणी होणार्या शासकीय कार्यक्रमानिमित्त अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहत असल्याने किल्ल्याची कसून तपासणी करण्यात येते. मात्र, अशा प्रकारे शस्त्रास्त्रांचा मोठा साठा मिळाल्याने तपास यंत्रणांच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लाल किल्ला लष्कर-ए-तोयबाचे टार्गेट
लाल किल्ल्यात पुरातत्त्व विभागाकडून सफाईचे काम सध्या सुरू असून, ही साफसफाई सुरू असताना मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके सापडली. ज्या ठिकाणी सहसा कोणी जात नाही, अशा ठिकाणी ही स्फोटके होती. स्फोटके लपवून ठेवण्यात आली होती. यामध्ये काडतुसांची संख्या मोठी आहे. सुरक्षा आणि राष्ट्रीय अस्मितेच्या दृष्टीने लालकिल्ला अत्यंत संवेदनशील मानला जातो. असे असतानाही मोठ्याप्रमाणात स्फोटके मिळाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. 26 जानेवारीस प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरक्षा कर्मचार्यांनी किल्ल्याच्या परिसराची कसून तपासणी केल्याचा दावा केला होता. हा दावा फोल ठरला आहे. लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी 22 डिसेंबर 2000 रोजी लाल किल्ल्यावर हल्ला केला होता. या दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तीन भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर अनेकदा लालकिल्ल्यावर हल्ला करण्याची धमकी दहशतवादी संघटनांकडून देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत लाल किल्ल्यावर मोठ्याप्रमाणात काडतुसे आणि स्फोटके मिळाल्याने एकूणच सुरक्षेच्या दृष्टीने काम करणार्या यंत्रणांच्या कामाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.