जळगाव । शहरातील ला.ना. शाळेच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीलाच लागून असलेलेच्या जॉकी कपड्यांच्या शोरूमध्ये चोरट्यांनी डल्ला मारीत 15 हजार रुपयांची रोकड तर 15 हजार रुपये किंमतीचे कपडे चोरून नेले. तेवढ्यातच न थांबता चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारी असलेल्या पेहनावा वुमन अॅण्ड किडस् या दुकानाकडे वळवला. मात्र, दुकानाचे लॉक तोडता न आल्याने चोरट्यांनी बाजूलाच असलेल्या गोंविद मंत्री यांच्या हॉस्पीटलमध्ये प्रवेश करत चोरीचा प्रयत्न केला. हॉस्पीटमधून त्यांनी कागपत्रे, तसेच डायर्या चोरून नेल्या आहेत. ही घटना सोमवारी सकाळी दुकान मालक आल्यानंतर उघडकीस आली. जिल्हा पेठ पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.
मागच्या खिडकीतून घुसला चोरटा
(घटना-1) जगताप कॉम्प्लेक्स मध्ये विनीत महेंद्र भन्साळी यांच्या मालकीचे जॉकी कपड्याचे शोरूम आहे. रविवारी चोरट्यांनी ला. ना. शाळेच्या भिंतीवरून उडी मारून रात्री 1.56 वाजता मागच्या खिडकीच्या बाहेर असलेली लोखंडी जाळी तोडली. त्यानंतर खिडकीची चौकट तोडून आत प्रवेश केला. तळ मजल्यावरून वरच्या मजल्यावर चोरटा गेला. मात्र वरच्या मजल्यावर काचेचा दरवाजा असल्याने तो परत खाली आला. दुकानातून कात्री आणि लोखंडी टोचा घेऊन गेला. त्याच्या सहायाने काचेचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तुटला नाही. चोरट्याने त्याच्या जवळ असलेल्या टॅमीने दरवाजाचे ब्रॅकेट तोडून काच फोडला. त्यानंतर आत जाऊन नवीन कपडे घालून बघितले. मापाचे कपडे घालून तसेच सोबत 15 हजारांचे कपडे आणि गल्ल्यात असलेले 15 हजार रुपये घेऊन चोरटा 2.18 वाजता पुन्हा आला त्याच रस्त्याने परत गेला.
पेहनावा दुकानाचा लॉक तोडण्याचा प्रयत्न
(घटना-2) चोरट्यांनी लागलीच आपला मोर्चा दोन दुकाने सोडून जयेश सुभाष जैन यांच्या पेहनावा वुमन्स अॅण्ड किड्स् या दुकानाकडे वळवला. त्यानंतर शटर लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. परंतू दुकानाचा सेंटर लॉक तोडता न आल्याने चोरट्यांना खाली हात परतावे लागले. यात चोरट्यांना अपयश आल्याने त्यांनी शेजारी असलल्या गोंविद मंत्री यांचे वरच्या मजल्यावरील हॉस्पीटलच्या दरवाज्याचे लॉक तोडून आत प्रवेश केला. आणि हॉस्पीटलमधल्या फाईली, डायर्या, कागदपत्र चोरून नेली.
चोरटा सीसीटीव्हीत कैद
जॉकी शोरूम, पेहनावा वुमन्स अॅण्ड किडस् या दुकानांहस गोंविद मंत्री यांच्या हॉस्पीटलमधील सीसीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा कैद झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात रूमाल बांधलेला एक चोरटा दिसून आला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.
क्लिनीक फाईल, डायर्या चोरी
(घटना-3)सोमवारी सकाळी गोंविद मंत्री यांच्या हॉस्पीटलमधील कर्मचारी कामावर आल्यानंतर त्याला दरवाज्याचे कुलूप तोडलेले दिसले. आत प्रवेश केल्यानंतर फाईली तसेच कागदपत्रे व डायर्या चोरीला गेल्याचे लक्षात आले. हॉस्पीटलमध्ये चोरी झाल्याचे कळताच शेजारील दोन दुकानांमध्ये देखील चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर दुकान मालकांनी जिल्हा पेठ पोलिसांना चोरी झाल्याचे कळवताच जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी नाना तायडे, जगन तायडे, अजित पाटील, रवी नरवाडे, राजेंद्र मेंढे आदी कर्मचार्यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. यानंतर ठसे तज्ञ देखील घटनास्थळी दाखल झाले होते.