पिंपरी । लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळून राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी लिंगायत समन्वय समितीतर्फे रविवारी (दि. 15) पुणे येथील बाजीराव रोड येथील बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यापासून राज्यस्तरीय महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. लाखो लिंगायत बांधव या महामोर्चात सहभागी होणार आहेत, अशी माहिती लिंगायत धर्म महासभा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रामू देशिंगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
या महामोर्चात लिंगायत समाजाच्या 50 धर्मगुरुंसह पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्हा परिसरातून तसेच संपूर्ण राज्यातून आणि कर्नाटक, तेलंगणामधून लाखो लिगांयत बांधव सहभागी होणार आहेत. या महामोर्चात 103 वर्षांचे राष्ट्रसंत डाॅ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर, जगद्गगुरु चन्नबस्वानंद महास्वामी, डॉ. बसवलिंग पट्टदेवरु भालकी स्वामीजी यांच्यासह अनेक धर्मगुरु आदी सहभागी होऊन उपस्थित समाजबांधवांना मागर्दशन करणार आहेत. महामोर्चा रविवारी सकाळी 10 वाजता पुणे येथील बाजीराव रोड वरील भारत संचारनिगम लि.कार्यालयासमोरील बसवेश्वर महाराजांच्या पुतळा, महात्मा बसवेश्वर पुतळा चौक येथून सुरु होणार आहे.
लिंगायत धर्माला संविधानीक मान्यता मिळून अल्पसंख्यांक दर्जा मिळावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. कर्नाटक सरकाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने लिंगायत धर्माला त्वरीत मान्यता देऊन त्याविषयी केंद्रसरकारला शिफारस पाठवावी, लिंगायतांना अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करावा, 2021 मध्ये होणाऱ्या भारताच्या राष्ट्रीय जनगणनेत लिंगायत धर्माच्या लोकसंख्येची स्वतंत्र्य नोंद होण्यासाठी सरकारने लोकसंख्या पारपत्रामध्ये विशिष्ट स्वरुपात नोंदीची व्यवस्था करावी, अशा असंख्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे. महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन लिंगायत धर्म महासभा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रामू देशिंगे,लिंगायत धर्म महासभा पुणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली पाटील,लिंगायत धर्म महासभा पुणे जिल्हा अध्यक्ष शिवकुमार आग्रे यांनी केले आहे.