बार्सिलोना : फुटबॉलच्या मैदानात प्रसिद्ध असलेले लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो हे तुम्हाला माहिती असतीलच. मैदानात हे दोघेही एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी सध्या त्यांच्या ‘किसिंग’मुळे जगभरातील फुटबॉल प्रेमींमध्ये ते चर्चेचा विषय बनले आहेत. बार्सिलोना येथे लियोनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो हे एकमेकांना किस करत असल्याचे चित्र रेखाटण्यात आले आहे. सेंट्रल बार्सिलोना येथील एका बस स्टॉपवर रेखाटण्यात आलेल्या या चित्राची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
सामन्याच्या निमित्ताने
फुटबॉलपटू मेस्सी आणि पोर्तुगालचा रोनाल्डो एकमेकांचे चुंबन घेत असल्याचे चित्र सेंट्रल बार्सिलोनाच्या एका बसस्टॉपच्या भिंतीवर रेखाटण्यात आले आहे. या चित्रात मेस्सीच्या हातामध्ये लाल रंगाचे एक गुलाबाचे फुलही दाखवण्यात आले आहे. रिअल माद्रिद आणि बार्सिलोना फुटबॉल क्लबमध्ये होणार्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर हे चित्र रेखाटण्यात आल्याने फुटबॉल प्रेमींमध्ये एक वेगळीच चर्चा रंगली आहे.
चित्रातून सकारात्मक संदेश
रिअल माद्रिद आणि बार्सिलोना फुटबॉल क्लब यांच्यात फुटबॉलचा सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये मेस्सी बार्सिलोनाकडून आणि रोनाल्डो रिअल माद्रिदकडून खेळणार आहे. 23 एप्रिल रोजी बार्सिलोना आणि कॅटालोनियातील लोक व्हॅलेंटाइन डे साजरा करतात. त्याचे औचित्य साधून फुटबॉल विश्वातील दोन दिग्गज खेळाडूंमधील प्रेम दाखवण्यासाठी हे चित्र रेखाटले असल्याचे चित्रकार सल्वा ट्बॉय यांनी सांगितले आहे. मेस्सी व रोनाल्डो हे प्रतिस्पर्धी आहेत. ते एकमेकांचे कधीच चुंबन घेणार नाहीत. मात्र, ते एकमेकांचे मित्र होऊ शकतात. सामन्याच्या पार्श्वभूमीवर हा सकारात्मक संदेश देण्याचा माझा प्रयत्न असल्याचेही सल्वा ट्बॉय यांनी म्हटले आहे.