सिंधुदुर्ग : आयर्लंडच्या भावी पंतप्रधानाच्या पदासाठी सिंधुदुर्गच्या लीओ वराडकर यांचे नाव दावेदार म्हणून पुढे आले आहे.
लिओ मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराड गावचे. अशोक वराडकर आणि पत्नी मरियम यांचे तिसरं अपत्य आहेत. लिओ सध्या आयर्लंडचे सामाजिक संरक्षण मंत्री आहेत. डबलीनच्या ट्रिनिटी महाविद्यालयातून 2003 साली त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली. त्यानंतर फाइन गेल या ख्रिश्चन डेमोक्रेटिक पॉलिटिकल पार्टीतर्फे ते राजकारणात आले. विशेष म्हणजे लिओ हे मंत्रीमंडळातले पहिले गे सदस्य आहेत. 2011 ते 2013 या कालावधीत त्यांनी वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रीपद भूषवलं. 2014 ते 2016 या काळात ते आयर्लंडचे आरोग्य मंत्री होते. वराडकर कुटुंबियांचं गावात घर आणि बागायती शेती आहे. त्यांची शेती आणि घर हे त्यांचे चुलत बंधू वसंत वराडकर सांभाळतात. लिओची आई मरियम आणि बाबा अशोक वराडकर वर्षातून एक-दोनदा मूळ गावी येतात. गावी आल्यावर ते मालवणी पाहुणचार स्वीकारतात, त्यांना अजूनही मराठी भाषा, काही कोकणी शब्द बोलता येतात, निवडणूक जिंकल्यास लिओ मूळगावी येऊन देवीचं दर्शन घेणार, असं लिओ यांचे काका वसंत वराडकर सांगतात.