‘लिज्जत’ने दिले स्वाभिमानाचे आयुष्य – प्रकाश जावडेकर

0

श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड संस्थेचा सुवर्णमहोत्सव

पुणे : ‘लिज्जत’ परिवाराने महिलांना ओळख देऊन स्वावलंबी बनवले. मेहनत व स्वाभिमानाच्या जोरावर गरीब व्यक्तीही मोठ्या पदावर जाऊ शकतो, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या रूपाने गरिबांचा सन्मान झाला आहे. एखाद्याला पकोडेवाला म्हणून हिनवणं सोपं असतं. मात्र तो स्वत:चा व्यवसाय करून स्वाभिमानाने जगत असतो हे लक्षात ठेवावे लागेल. ‘लिज्जत’ पापड बनवणार्‍या महिला अशाच प्रकारे स्वाभिमानाचे आयुष्य जगत आहेत. असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ‘लिज्जत रत्न’ पुरस्कारांचे वितरण जावडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी गिरीश बापट, पणनमंत्री सुभाष देशमुख, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, उल्हासदादा पवार, गिरीश गांधी, डॉ. कुमार सप्तर्षी, संस्थापिका जसवंती बेन, स्वाती पराडकर, प्रतिभा सावंत, सुरेश कोते, सुमन दरेकर, कमल कोळगे, विमल कांबळे, रत्नमाला जाधव, मंदाकिनी दाखवे, चेतना नहार उपस्थित होते.

यावेळी दि महाराष्ट्र राज्य अर्बन को. ऑप. बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, साहित्यिका डॉ. मनिषा पोतदार, ‘सरहद’चे संजय नहार, ‘मुक्तांगण’च्या मुक्ता पुणतांबेकर, कर्नल हेमंत दरेकर, सामाजिक कार्यकर्ते राहुल देशमुख, डॉ. मिलिंद भोई, सचिन ईटकर, पत्रकार अलका धूपकर, हालिमा कुरेशी यांना ‘लिज्जत रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

लिज्जत पापड समूह खर्‍या अर्थाने चिरंतर

सुभाष देशमुख म्हणाले, स्वयंरोजगारातून विकास साधलेल्या या महिला आहेत. 50 हजार महिला एकत्रितपणे चांगले काम उभारू शकतात, हे लिज्जत पापडने दाखवून दिले आहे. गिरीश बापट म्हणाले, अनेक व्यवसाय सुरू होतात आणि बंदही होतात. मात्र, सलग 50 वर्षे काम करत राहणारा आणि दिवसेंदिवस प्रगती करत असणारा लिज्जत पापड समूह खर्‍या अर्थाने चिरंतर आहे.

‘गुजरात मॉडेल’पेक्षाही चांगले

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, सर्वोदय विचार, सहकारी भावना, स्त्री आधार आणि जाती निर्मूलन या चार मूल्यांवर आधारलेली ही संस्था विकासात महत्त्वाचे योगदान देत आहे. बेरोजगारीवर स्वयंरोजगार हाच उपाय असल्याचे ‘लिज्जत’ने दाखवून दिले आहे. हे मॉडेल ‘गुजरात मॉडेल’पेक्षाही अधिक चांगले आहे. मुक्ता टिळक म्हणाल्या, महिलांचे उद्योग गट निर्माण करण्याचे काम लिज्जतने केले. महिलांचे सबलीकरण कसे करावे, याचे उत्तम उदाहरण हे 1600 कोटींची उलाढाल असणारे लिज्जत आहे. पवार म्हणाले, सात महिलांपासून सुरू झालेला प्रवास आज 50 हजार महिलांपर्यंत व 1600 कोटींच्या उलाढालीपर्यंत पोहोचला आहे. खा. शिरोळे म्हणाले, घरकाम करणार्‍या महिलांचे कौशल्य ओळखून त्यांच्या हाताला काम दिले. सध्या डिजिटलकडे जाण्याचा जमाना आहे. त्यामुळे ‘लिज्जत’नेही काळाची पावले ओळखून बदल करावेत. प्रास्ताविक स्वाती पराडकर यांनी केले. गिरीश गांधी, अलका धुपकर यांनीही मनोगत व्यक्त केले. राहुल सोलापूरकर, माया प्रभुणे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कोते यांनी आभार मानले. तत्पूर्वी, दिलीप हुल्याळ, स्मिता ओक यांच्या नाट्याने रंगत आणली.

एक्झिटपेक्षा एक्झॅक्ट पोल महत्त्वाचा

कार्यक्रमानंतर बोलताना जावडेकर म्हणाले, एक्झिट पोल ही एक चर्चा आहे. ही चर्चा खुशाल व्हावी. मात्र, 11 तारखेला खरे चित्र समोर येणार असून एक्झिटपेक्षा एक्झॅक्ट पोल महत्त्वाचा आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर राजस्थान, मध्यप्रदेश या दोन महत्त्वाच्या राज्यात काही माध्यमांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून सरकार बदलणार असल्याचे भाकीत केले आहे. यावर निवडणुकीनंतर अनेक एक्झिट पोल येतात. त्यावर चर्चाही केली जाते. मात्र, चर्चा करणार्‍यांना लवकरच खरे चित्र दिसेल आणि ते अधिक महत्त्वाचे आहे, असे म्हणत त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.