‘लिज्जत पापड’ने उभारले महिलांचे नेतृत्व – सुशीलकुमार शिंदे

0

मृणाल कुलकर्णी यांना ’लिज्जत रत्न’ पुरस्कार

पुणे : महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे, असे नेहमी बोलले जाते. परंतु प्रत्यक्षात महिलांचे नेतृत्व उभारण्याचे काम ’लिज्जत पापड’ने केले आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख देण्यासह स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम ’लिज्जत पापड’ने केले. महिलांना स्वयंरोजगार कसा द्यावा, याचे उत्तम उदाहरण लिज्जत पापडच्या रूपाने आपल्यासमोर आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी सुशीलकुमार शिंदे बोलत होते.

गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या महोत्सवात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना ’लिज्जत रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, अभय छाजेड, रामदास फुटाणे, राहुल सोलापूरकर, खासदार वंदना चव्हाण, डॉ. उषा काकडे, सचिन ईटकर, स्वाती पराडकर, सुमन दरेकर याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी राहूल सोलापूरकर यांच्या ’प्रभात ते सैराट’ या मराठी चित्रपट सृष्टीच्या प्रवासावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

महिलांना मिळाला रोजगार

घरात असणार्‍या महिलांच्या हाताला रोजगार देण्याचे काम लिज्जत पापडने केले आहे. आज लिज्जत पापडच्या कुटुंबात 50 हजार पेक्षा जास्त महिला काम करत आहेत. या उद्योग समूहाचे नेतृत्व महिलांच्या हाती असल्याने त्याचे नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने होते आहे. शिवाय, महिलांमधील नेतृत्वगुण विकसीत होत आहेत. आगामी काळातही हे काम असेच सुरू राहावे, अशी अपेक्षा सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

स्वत:ची काळजी घेणे गरजेचे

महिलांना सन्मान आणि आत्मविश्‍वास देण्याचे काम ’लिज्जत’ने केले आहे. दिवसभर कष्ट करून आपल्या संसाराला हातभार लावणार्‍या बायकोचे कौतुक करण्याची सवय नवर्‍याने लावावी. त्यातून नात्यातील गोडवाही वाढेल. आपल्या कुटुंबातील आपण प्रमुख आहोत याच आत्मविश्‍वासाने आपण आयुष्य जगले पाहिजे. कुटुंबाची काळजी घेताना स्वत:ची काळजी घेणे पण तितकेच गरजेचे आहे, असे सिंधूताई सपकाळ यांनी यावेळी सांगितले.

महिलांनी कर्तृत्व सिद्ध केले

लिज्जतचा हा पुरस्कार म्हणजे माहेरची साडी मिळाल्याचा आनंद आहे. जगभरात आपल्या उद्योगाची ख्याती पसरविणार्‍या ’लिज्जत’वर चित्रपट बनावा. विविध अनुभवांचा सामना करीत या महिलांनी स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले आहे. आपल्याप्रमाणेच मुलीला आणि सुनेलाही घडवावे, त्यांची प्रेरणा बनावे, असे मृणाल कुलकर्णी यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले.

ममता बालसदनला तीन लाखाची देणगी

लहानपणासून लिज्जत पापडची जाहिरात पाहत आले आहे. ती जाहिरात पाहून पापड खायची नेहमीच इच्छा व्हायची. इतकंच नव्हे, तर ’राधिका’ साकारतानाही तुमच्या सर्वांकडून प्रेरणा मिळते. प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी, स्वत:साठी काम करते. त्यातूनच ती प्रमुख बनते, असे अनिता दाते यांनी सांगितले. यावेळी ’लिज्जत पापड’तर्फे सिंधूताई सपकाळ यांच्या ममता बालसदन संस्थेला तीन लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती पराडकर यांनी केले. माया प्रभुणे यांनी सूत्रसंचालन तर सुरेश कोते यांनी आभार मानले.