लिटल चॅम्प विजेत्या अंजली, नंदिनी गायकवाड यांचे बहारदार गायन

0
भगिनींच्या गाण्यांनी दिघीकर झाले मंत्रमुग्ध
दिघी : भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार, प्रचार व्हावा आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने दिघीतील आरोही संगीत विद्यालयाच्या आयोजित वार्षिक संगीत महोत्सवात लिटल चॅम्प विजेती अंजली व नंदिनी गायकवाड या दोन बहिणींनी बहारदार गायन सादर केले. त्यांच्या गायनाने दिघीकर मंत्रमुग्ध झाले. दिघीतील आरोही संगीत महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला आहे. माजी नगरसेवक दत्ता गायकवाड आणि लिटल चॅम्प विजेती अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, नगरसेविका निर्मला गायकवाड, हिराबाई घुले, सामाजिक कार्यकर्ते कुलदिप परांडे, प्रसिद्ध गायक अंगद गायकवाड, तबला वादक रोहित गडकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी केली कला सादर
विद्यार्थ्यांनी ‘हिच आमुची प्रार्थना’ हे गीत विविध अंगांनी सादर करुन रसिकांची मने जिंकली. राग मालकंस, राग भिमपलास, राग भुपाली अशा अनेक रागांवर आधारीत विविध बंदिशी सादर केल्या. यामध्ये विद्यार्थ्यांपासून गृहणी देखील सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थ्यांनी बहारदार गायन सादर केले. यामध्ये 50 हून अधिक कलाकारांनी आपल्या गायन वादनाची वैशिष्ठयपूर्ण कला सादर केली. कार्यक्रमाच्या शेवटी लिटल चॅम्प विजेती अंजली गायकवाड व नंदिनी गायकवाड या बहिणींनी राग यमन मधील ‘गाओ गाओ मंगल गीत बजाओ’ ही ताल, तीनतालातील बंदिश सादर करत बहर आणली. त्यानंतर ‘कानडा राजा पंढरीचा’ हे भक्तीगीत आणि ‘घेई छंद मकरंद’ ही रचना सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. अंगद गायकवाड यांनी ‘धन्य भाग सेवा का अवसर पाया’ भैरवी सादर केली.
गाण्यांना उर्त्स्फुत प्रतिसाद
या गायकवाड भगिनींनी अत्यंत सुरेल आवाजात सादर केलेल्या रचना उपस्थित श्रोत्यांना मनापासून आवडल्या. त्यांनी केलेल्या सादरीकरणाला श्रोत्यांनी उर्त्स्फुत दाद दिली. तसेच आरोही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गाण्यांनाही उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यामुळे उत्साहाचे वातावरण दिसत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. युवराज शिंदे आणि रोशनी सुपे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रणजित राठोड, शिवाजी चामनर, राजपाल गायकवाड, निलेश खेडकर, उदय पाटील, रमेश गावीत, मंदार जोशी, सुनिला जिरगाळे, गंगासागर डाके, प्रियंका श्रीमंगले यांनी पुढाकार घेतला.