नवी सांगवी : जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये दैदीप्यमान यश संपादन केले आहे. 17 वर्षाखालील या खो-खो स्पर्धेत मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला; तर 17 वर्षाखालील मुलींच्या संघानेही उत्कृष्ट सांघिक कामगिरी करीत द्वितीय क्रमांक मिळवला. या दोन्ही संघांना प्रमाणपत्र, पदक, ट्रॉफी भेट देण्यात आली. या दोन्ही संघांची कोल्हापूर येथे होणार्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
विजेत्या संघांचे अभिनंदन
क्रीडा शिक्षक रामेश्वर हराळे, जीवन सोलंकी यांनी विद्यार्थांची तयारी करून घेतली. विजेत्या दोन्ही संघांचे संस्थेच्या सचिव आरती राव, उपाध्यक्ष पणव राव, स्कूलच्या मुख्याध्यापिका गीता येरूणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील यांनी अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हास्तरीय स्पर्धेत यश संपादन केल्यानंतर खेळाडुंचा आत्मविश्वास दुणावला असून, आता राज्यस्तरीय स्पर्धेतही चांगली कामगिरी करण्याचा मानस खेळाडुंनी व्यक्त केला.