महापालिका आयुक्तांना दिले निवेदन
सांगवी : पिंपरी चिंचवड शहराच्या वैभवात भर घालणारे लिनियर गार्डनचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. आत्तापर्यंत दुसर्या टप्यापर्यंतचे काम पुर्ण होत आले असुन यंदाच्या वर्षात ते सामान्यांसाठी खुले होण्याची अपेक्षा येथील स्थानिक बाळगुण आहेत. पिंपळे सौदागरच्या स्वराज चौक ते कोकणे चौकापर्यंतच्या दोन किमी लांबीचे हे उद्यानाला महापालिकेचा महत्वाकांशी प्रकल्प म्हणून पाहिले जात आहे. सांगवी परिसरातील पिंपळे सौदागर येथील नव्याने विकसित होत असलेले लिनिअर गार्डन रहाटणी पर्यंत वाढविण्याची मागणी करणार असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांनी दिली. याबाबत लवकरच ते महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन याबाबतचे रितसर पत्र ते देणार आहेत.
उद्यान आणि सुरक्षित वाहतूक
महापालिकेने नुकतेच कोकणे चौक ते काळेवाडी फाट्यापर्यंत उच्चक्षमता द्रुतगती (एचसीएमटीआर) मार्गाचे काम सुरू केले. तीस मिटर रुंदीच्या या रस्त्यामुळे पिंपळे सौदागरवरील वाहतुकीचा ताण हलका होऊन वाहतूक कोंडी कमी होणार आहे. प्रस्तावित एचसीएमटीआर 30 मिटर रस्ता व सध्याचा सुरू असलेला 12 मिटर डीपी रस्ता अशा एकूण 42 मिटर रूंदी होते. त्यात 24 मिटर हा एचसीएमटीआर रस्ता करून उर्वरित 18 मिटर मध्ये लिनिअर गार्डन झाल्यास स्थानिकांची उद्यान आणि सुरक्षित वाहतूक या दोन्ही बाजु पुर्ण होत असल्याचे नगरसेवक नाना व शितल काटे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
लोक भावनेचा आदर करावा
नगरसेवक नाना काटे म्हणाले की, सध्याचे नियोजित लिनियर गार्डन पार्क रॉयल पर्यंत होणार होते. याबाबत तत्कालिन आयुक्त राजीव जाधव यांनी पहाणी देखील केली होती. त्यामुळे सध्याचा उच्चक्षमता द्रुतगती मार्ग चोविस मिटरचा करून उर्वरीत अठरा मिटरमध्ये लिनियर गार्डन करून पर्यावरण पूरक असा सुवर्ण मध्य साधावा व लोक भावनेचा आदर करावा. शीतल काटे म्हणाल्या की, या गार्डनमुळे परिसरातील नागरिकांना एक चांगली सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हे गार्डन रहाटणीपर्यंत वाढवावे अशी मागणी आयुक्तांकडे करणार आहोत.