लिलाताई ओक यांच्या निधनामुळे भुसावळ शहराची हानी

0

भुसावळ- जनसंघाच्या उभारणीच्या काळात उमेदवार मिळत नसल्याची स्थिती असताना नगरपालिकेची निवडणूक जिद्दीने लढवून यश मिळवत शहराच्या पटलावर आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणार्‍या माजी उपनगराध्यक्ष लिलाताई रामचंद्र ओक (92) यांचे गेल्या 12 ऑगस्ट रोजी वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने शहराची अमरिमीत हानी तर झालीच शिवाय त्यांची पोकळी ही न भरून निघणारी आहे.

1948 साली संघ सत्याग्रहात पती रामभाऊ ओक यांची सरकारी नोकरी गेल्यावर घरातच उभयंतांनी किराणा दुकान सुरू केले व नावारुपालाही आणले. पदरात पाच मुले असतांनाही संसारासह दुकान सांभाळूनही ताईंनी संघाची कास सोडली नाही. भुसावळमध्ये येणार्‍या प्रत्येक प्रचारकाची विचारपूस, जेवणखाण इ. अखेरच्या श्‍वासापर्यंत त्यांनी सांभाळले. स्व. दिनदयाल उपाध्याय, स्व. आबाजी थत्ते, माजी सरसंचालक सुदर्शनजी यांच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा पाहुणचार करण्याचेही भाग्य लिलाताईंना लाभले.

संबंध आयुष्य केले राष्ट्रसेवेसाठी खर्च
तत्कालीन नगरपालिकेत 33 पैकी जनसंघाचे फक्त 3 सदस्य असतांनाही स्व. दिनदयालजींचा नागरी सत्कार नगरपालिकेत घडवून आणला तसेच नगरपालिका उद्यानात स्व. शामाप्रसाद मुखर्जींचा पुतळा स्थापन करून घेतला. नगरपालिका सभासदत्वाच्या पाच वर्षांच्या काळात नगराध्यक्षा अमीनाबाई रहेमान व उपनगराध्यक्षा लिलाताई ओक व स्थायी समिती अध्यक्ष सत्यभामाबाई मोरे असे सोशल इंजिनिअरींग भुसावळकरांनी एक वर्ष अनुभवले. कालांतराने लिलाताईंचा राजकीय ओढा कमी झाला व मुळ सामाजिक कामात रस वाटू लागला. राष्ट्रसेविका समिती व विश्‍व हिंदू परिषद यांचे सर्व कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेवू लागल्या. आणिबाणीच्या भीषण काळात संघावर बंदी असूनही ‘मिसाबंदी’ यांच्या घरी संपर्क करून कुटुंबियांना धीर देणे, गरजेनुसार त्या-त्या कुटुंबांना काही निधी वाटप व वस्तू वाटप यांतही सहभाग होता. (स्वतःची दोन मुले मिसामध्ये असूनही) सन 2000 व 2001 मध्ये सामाजिक व संघ परिवाराच्या संस्थात कार्यरत असलेल्या अतिशय कर्तृत्ववान, मदन व मोहन या जुळ्या मुलांच्या अचानक निधनाचा धक्का पचवून स्वतः धैर्याने उभ्या राहिल्या व कुटुंबालाही सावरुन घेतले.
श्री. अजय एकनाथ भोळे
भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस (ओबीसी मोर्चा), महाराष्ट्र
भुसावळ, मो. 9422778076