लिली किंगचा जागतिक विक्रम

0

बुडापेस्ट । ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती अमेरिकेच्या लिली किंगने जागतिक अजिंक्यपद जलतरण स्पर्धेतही आपला दबदबा कायम राखला आहे. लिलीने महिलांच्या 100 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत विश्‍वविक्रम रचत स्पर्धेतील विजेतेपदावरही आपला हक्क सांगितला आहे. मंगळवारी रात्री उशीरा झालेल्या स्पर्धेत लिलीने 100 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत 1मिनीट 4.13 सेकंद अशा विक्रमी वेळेसह सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीसह लिलीने लिथुआनियाच्या रूटा मिलुताईतेने 2013 मध्ये नोंदवलेला विश्‍वविक्रम मोडीत काढला. लिलीने ऑलिम्पिकमधील अंतिम फेरीप्रमाणे यावेळीही आपली कट्टर हाडवैरी जलतरणपटू रशीयाच्या युलीया एफिमोव्हाला मागे टाकले. अमेरिकेच्या केटी मेलीने 1 मिनीट 5.03 सेकंद अशा वेळेसह रौप्यपदक जिंकले.

20 वर्षीय किंगने रिओ ऑलिम्पिक दरम्यान रशियन जलतरणपटू एफिमोव्हाला ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिल्याबद्दल प्रश्‍न उपस्थित केला होता. एफिमोव्हा दोन वेळा उत्तेजक चाचणीत दोषी सापडली होती त्यामुळे किंगने हा मुद्दा उचलून धरला होता. त्यामुळे बुडापेस्टमध्ये या दोघीमधील अंतिम फेरीची लढत रंगतदार झाली. एफिमोव्हाला यावेळी कांस्यपदक मिळाले.