मुंबई: सध्या लिव्ह-इन-रिलेशनशिप किंवा वन नाइट स्टँडसारख्या नात्यांचे नवे स्वरूप उदयाला आले आहे. मात्र, या ’रिलेशन’मुळे अनेक वादांना तोंड फुटल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. या नात्यावर मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. स्त्री-पुरुषांमधील एका रात्रीचे शरीरसंबंध म्हणजे हिंदू कायद्यानुसार लग्न नाही. अशा संबंधातून जन्माला आलेल्या मुलांना वडिलांच्या संपत्तीवर हक्क सांगता येत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
उच्च न्यायालयाने अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाला नैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाप्रमाणेच वडिलांच्या संपत्तीवर दावा करण्याचा अधिकार आहे. मात्र, अनैतिक संबंधातून जन्माला आलेले मूल वडिलोपार्जित संपत्तीवर आपला अधिकार सांगू शकत नाही, हेदेखील उच्च न्यायालयाने नमूद केले आहे.
दावा करण्याचा अधिकार
मूल नैतिक की अनैतिक संबंधांतून जन्माला आले आहे, याचा निर्णय घेण्यासाठी ’विवाह’ ही महत्त्वाची अट आहे, असे न्या. मृदूला भाटकर यांनी अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलीच्या अर्जावर निर्णय देताना म्हटले आहे. मुलीच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यातून त्यांना मुलगी झाली. वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीवर दावा करण्याचा अधिकार अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाला अजिबात नाही, यात शंकाच नाही. मात्र, या मुलाला वडिलांच्या नैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाप्रमाणे वडिलांच्या संपत्तीवर व अन्य लाभांवर दावा करण्याचा अधिकार आहे. बेकायदा विवाहातून जन्माला आलेल्या मुलासंदर्भातील काही सामाजिक विसंगती दूर करण्यासाठी कायदेमंडळाने प्रगतिशील पाऊल उचलले आहे, असे न्या. भाटकर यांनी म्हटले.
मूल जन्माला येणे नैसर्गिक
विवाह एक सामाजिक बंधन आहे, तर मूल जन्माला येणे हे नैसर्गिक आहे. कधी आणि कसा जन्म घ्यायचा, हे माणसाच्या हातात नाही. त्यामुळे अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाला त्याच्या अधिकारापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही. तेच मूल जर नैतिक संबंधातून जन्माला आले असते तर त्याला जे अधिकार मिळाले असते, ते त्याला द्यायला हवेत, असेही न्या. भाटकर म्हणाले. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाचे वडील त्याच्या जबाबदारीतून हात झटकू शकत नाही, अशा मुलांच्या अधिकारांचे संरक्षण करायला हवे. परंतु, विवाह न करता झालेल्या मुलाला कोणत्याही प्रकारची कायदेशीर मान्यता मिळत नाही, असे न्या भाटकर यांनी म्हटले. एका रात्रीचे संबंध किंवा एखाद्या पुरुष आणि महिलेने संमतीने एकमेकांशी ठेवलेले शारीरिक संबंध म्हणजे विवाह नाही, असेही न्या. भाटकर यांनी स्पष्ट केले.