‘लिव्ह इन रिलेशन’मधील मुलांनाही पोटगीचा अधिकार!

0

चंदीगड : ’लिव्ह इन रिलेशन ही असाधारण गोष्ट नाही. या रिलेशनशिपमधून होणार्‍या मुलांनासुद्धा विवाहीत दांपत्याकडून होणार्‍या मुलांप्रमाणे पोटगी मिळविण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, लिव्ह इनमध्ये राहणार्‍या महिलेलासुद्धा पोटगी मिळविण्याचा अधिकार आहे.

काय आहे प्रकरण?
गुरूग्राममध्ये एक जोडपे 2007 सालापासून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. त्यांना 2011 मध्ये एक मुलगा झाला. या प्रकरणातील महिलेने तिच्या जोडीदारावर आरोप केला आहे. आपण घटस्फोटीत असल्याचे त्या महिलेच्या प्रियकराने सांगितले होते. तसेच याचिकाकर्त्या महिलेशी लग्न करणार असल्याचेही त्यांने सांगितले होते. महिलेला वचन दिल्यानंतर त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याचे सांगितले होते. पण त्यानंतर लग्नाचे वचन देणार्‍या तिच्या प्रियकराने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नसल्याचे समजले. लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर जेव्हा त्या माणसाने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्या महिलेच्या लक्षात आले. नंतर तिने या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. या महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने लिव्ह इन रिलेशन असाधारण नसल्याचे सांगितले. तसेच लिव्ह इनमधून होणार्‍या मुलाला पोटगी मिळविण्याचा अधिकार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

लिव्ह इन रिलेशनशिपही समाजमान्य बाब!
सुनावणीदरम्यान न्यायालयाने लिव्ह इनमधून झालेल्या मुलाला दहा हजार रूपये तर त्या महिलेला 20 हजार रूपये पोटगी दिली जावी, असा निर्णय दिला. या प्रकरणातील पुरूषाने कौटुंबीक न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देत आपले लग्न झाले आहे हे महिलेला माहिती असल्याचे न्यायालयास सांगितले. तसेच ती महिला मोठी रक्कम घेऊन वेगळी झाली आहे, त्यामुळे आता पोटगीसाठीची रक्कम रद्द करावी, अशी मागणीही त्याने केली. पंजाब उच्च न्यायालयाने पोटगी संबंधातील कौटुंबीक न्यायालयाच्या निर्णयाला योग्य ठरवले आहे. आजच्या काळात लिव्ह इन रिलेशनचे नातेसंबंध स्वीकारले जात आहेत. समाजात बदलही येतो आहे. त्यामुळे पोटगी मिळविण्याचा अधिकार लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणार्‍या महिलेला आणि तिच्या मुलाला मिळायला हवा, असे न्यायमूर्ती जयश्री ठाकूर यांनी सांगितले.