जळगाव । जामनेर तालुक्यातील लिहे तांडा हे गाव १० हजार लोकसंख्येचे आहे. गावातील लोकसंख्या अधिक असल्याने गावात शिक्षण घेणार्यांचे प्रमाण देखील अधिक आहे. विद्यार्थ्यासह नागरिकांना विविध शासकीय कामकाजासाठी किंवा इतर वैयक्तिक कामासाठी विविध प्रकारच्या दाखल्याची नेहमी आवश्यकता असते. शासकीय कामासाठी लागणार्या दाखल्यावर ग्रामसेवकाची स्वाक्षरी आवश्यक असते. त्याशिवाय संबंधीत दाखले ग्राह्य धरले जात नाही. मात्र लिहे तांडा येथील ग्रामस्थांची ग्रामसेवक सतत गैरहजर असल्याने गैरसोय होत आहे. शासकीय कामासाठी आवश्यक असलेल्या दाखले मिळविण्यासाठी ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयाची वारंवार चकरा मारतात परंतु त्यांना ग्रामसेवक हजर नसल्याने रिकामे हात परतावे लागते. गेल्या अनेक दिवसांपासुन असे सुरु असुन ग्रामस्थांचे दाखल्या अभावी कामे अडुन पडले आहे. कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यावर शासनाचे अधिक लक्ष आहे. कॅशलेस व्यवहारासाठी बँक खाते आवश्यक असल्याने सर्वानीच बँकेत खाते खोलण्यासाठी घाई केली आहे. बँकेत खाते खोलण्यासाठी रहिवासी दाखला देणे आवश्यक असतो. तसेच रहिवासी दाखल्यावर ग्रामसेवकाची स्वाक्षरी असल्यास ते बँक अधिकारी ग्राह्य धरतात. मात्र ग्रामसेवकांच्या गैरहजेरीने नागरिकांना बँक खाते खोलण्याला अडचण होत आहे.
अतिरिक्त कामामुळे ग्रामसेवकांकडून दुर्लक्ष
ग्रामसेवकांवर एकापेक्षा जास्त गावाची जबाबदारी देण्यात आल्याने ग्रामसेवकांकडून या गावाकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामसेवकाचे अनेक पद रिक्त असल्याने आणि शासनाकडून पुरेशा प्रमाणात पदभरती होत नसल्याने या ग्रामसेवकांवर अतिरिक्त गावांची जबाबदारी देण्यात आली आहे. लिहे तांडा येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवकावर शेंदुर्णी या गावासह इतरही दोन गावाची जबाबदारी देण्यात आली आहे. शेंदुर्णी हे गाव मोठे असल्याने ग्रामसेवक इतर गावाकडे लक्ष केंद्रीत करु शकत नसल्याने या गावाच्या नागरिकांना त्रास सहन करावे लागते.