जळगाव । शासनाच्या अजेंड्यावरील महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे स्वच्छ भारत अभियान. ग्रामस्वच्छतेसाठी शासन करोडो रुपये खर्च करत आहे. मात्र जिल्ह्यात अजुनही अस्वच्छता पसरलेली आहे. राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय तंत्रशिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघातील लिहे तांडा येथे अस्वच्छता पसरली असून ग्रामपंचातीने याकडे दुर्लक्ष केले आहे. ग्रामपंचायमार्फत नाले सफाई तसेच स्वच्छता विषयक कामे होत नसल्याने भावलाल राठोड या एका चहा विक्रेत्याने स्वःखर्चातुन ग्रामस्वच्छता मोहिम हाती घेतली असून गावातील नाले सफाई तसेच स्वच्छतेची कामे करत आहे. शेंदुर्णी येथील दोन माणसे गेल्या दोन-तीन दिवसापासून गावात येऊन नालेसफाई सोबत स्वच्छतेची कामे करीत आहे. त्यांची रोजंदारी भावलाल राठोड हे देत आहे.
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता कर्मचारी असतात. स्वच्छेसाठी जिल्हा परिषदेमार्फत निधी पुरविला जातो. या कर्मचार्यांमार्फत स्वच्छतेची कामे करण्यात येते. मात्र लिहे तांडा येथील ग्रामपंचायतीत एकही स्वच्छता कर्मचारी नसल्याने गावातील स्वच्छता होत नाही. पावसाळा सुरु असून नाले सफाई झालेली नसल्याने नाल्यात पाणी तुंबले असल्याने सर्वत्र दुर्गधीयुक्त वातावरण आहे. अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटारीत तुंबलेले पाणी रस्तावरुन वाहत असल्याने नागरिकांना त्यातुन ये-जा करावे लागत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना देखील यातुन मार्ग काढावे लागत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे.
केवळ 40 टक्केच हागणदारीमुक्त
लिहे तांडा या गावाची लोकसंख्या सात हजाराच्या जवळपास आहे. गावाची ग्रामपंचायत सदस्य संख्या ही 11 आहे. वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे विशेष प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे. हागणदारीमुक्तीकडे गावाची वाटचाल ही संथ गतीने सुरु असून गाव केवळ 40 टक्केच हागणदारीमुक्त झाले आहे. गावाची लोकसंख्या मोठी असल्याने तसेच ग्रामीण भाग असल्याने वैयक्तिक शौचालयाची संख्या कमी आहे. त्यामुळे सामुहिक शौचालयाची आवश्यकता अधिक आहे. तीन वर्षापूर्वी संपुर्ण गावासाठी केवळ एकच सामुहिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले होते, मात्र यात अद्यापर्यत संडाशीचे पात्र देखील बसविण्यात आलेले नसून पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने सामुहिक शौचालय वापराविना पडले आहे. पावसाळा सुरु असून ग्रामस्थांची शौचालया अभावी हाल होत आहे. उघड्यावर शौचास बसावे लागत असल्याने महिला सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झाले आहे.