लिहे तांडा-वाकोद रस्त्यावरील पुलाला भगदाड !

0

चारचाकी आणि अवजड वाहतूक बंद ; वाहतुकीला धोका

जळगाव: राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नदी व नाले पुन्हा ओसंडून वाहत आहेत. शेतीसह रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जामनेर तालुक्यातील लिहे तांडा ते वाकोद दरम्यानच्या रस्त्यावरील पुलाला मुसळधार पावसामुळे मोठे भगदाड पडले आहे. पुलाच्या मधोमध मोठा खड्डा पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला आहे. लिहे तांडा-वाकोद रस्त्यातील गोगडी नदीवरील पूलाल पाण्याच्या प्रवाहामुळे भगदाड पडले आहे. त्यामुळे चारचाकी आणि अवजड वाहनासाठी रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. केवळ दुचाकीसाठी पूल शिल्लक राहिला आहे. दुचाकीने प्रवास करणे देखील धोकेदायक बनले आहे.

यापूर्वी पावसाळ्याच्या सुरुवातीला पुलाचा काही भाग वाहून गेला होता. तरीही वाहतूक सुरू होती. आता पुलावरील काही भाग वाहून गेल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. पूल खचल्यामुळे वाकोद ते सोयगाव, वाकोद ते शेंदुर्णी दरम्यानच्या वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला आहे. दोन वर्षापूर्वीच लिहे तांडा गावाजवळील पुलाचे नव्याने काम करण्यात आले होते, त्या पुलाचे देखील मुसळधार पावसामुळे नुकसान झाले आहे. वाकोदहून पळासखेडा-लिहे तांडामार्गे सोयगाव, शेंदुर्णीला मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. सोयगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने वर्दळ मोठी असते. भविष्यात पूल पूर्णपणे तुटल्यास वाकोदहून शेंदुर्णी आणि सोयगावला दुचाकीने होणारी वाहतूक पूर्णपणे बंद होणार आहे. तत्पूर्वी बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.