लंडन – लीग चषक फुटबॉल स्पर्धेतील अटीतटीच्या अंतिम सामन्यात मँचेस्टर युनायटेडने साऊदम्टनचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव करून अजिंक्यपद पटकाविले. या अंतिम सामन्यात मँचेस्टर युनायटेडतर्फे स्वीडनचा 35 वर्षीय फुटबॉलपटू इब्राहीमोव्हिकने दोन गोल नोंदविले. 2017 च्या फुटबॉल हंगामात विविध स्पर्धामध्ये इब्राहिमोव्हिकने 26 गोल नोंदविले आहेत. जोस मॉरिनोच्या मार्गदर्शनाखाली मँचेस्टर युनायटेडचा या स्पर्धेतील हा चौथा विजय ठरला.
इब्राहिमोव्हिकने सामन्यात पहिल्या 19 मिनिटात मँचेस्टर युनायटेडला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली तर मँचेस्टर युनायटेडचा तिसरा गोल जेसी लीनगार्डने नोंदविला. साऊदम्टनचे दोन गोल मॅनेलो गॅबीडेनीने केले. इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये पहिल्या चार संघांत स्थान नसले तरी माजी विजेत्या मॅंचेस्टर युनायटेडने यंदाच्या मोसमात लीग करंडकांची कमाई केली. झाल्टन इब्राहिमोविकने अखेरच्या क्षणी केलेला गोल निर्णायक ठरला. युनायटेडचे प्रशिक्षक झाल्यानंतर खेळाडूंना करारबद्ध करण्याच्या मुदतीच्या अखेरच्या क्षणी मॉरिन्हो यांनी स्वीडनचा स्टार असलेल्या मॉरिन्होला युनायटेडमध्ये आणले. त्यांचा हा विश्वास इब्राहिमोविकने सार्थ ठरवला आणि त्यांना विजेतेपदाची भेट दिली. या अंतिम सामन्यात मॅंचेस्टर युनायटेडकडून करण्यात आलेल्या तीनपैकी दोन गोल इब्राहिमोविकने केले.