देहूरोड : रावेत-वाल्हेकरवाडी रस्त्यावर एका हॉटेलच्यामागील रस्त्यावर नारळ घेऊन येणार्या हॉटेल मॅनेजरला तीन मद्यधुंद तरुणांनी अडवून पैशांची मागणी केली. त्याने पैसे नसल्याचे सांगितल्यामुळे यातील एकाने त्यांना चाकुने भोसकले. दरम्यान मॅनेजरने बचावासाठी केलेल्या धाव्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान हल्लेखोरांपैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून एक जण मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
जखमीवर उपचार, प्रकृती स्थिर
याप्रकरणी हॉटेलचा कर्मचारी समरुलअली सदरअली विश्वास याने फिर्याद दिली आहे. प्रशांत देवीदास दाभाणे (वय 23, रा. आकुर्डी, गुरूद्वारा चौक) आणि सिध्दार्थ कृष्णा मांच्छी (रा. गुरूद्वारा चौक, आकुर्डी) यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर त्यांचा साथीदार भगवान प्रभाकर ठोके हा फरार आहे. हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात सत्यरंजन सत्येंद्रकुमार लेंका हे जखमी झालेले आहेत. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपचार करणार्या डॉक्टरांनी दिली. या प्रकाराने या मार्गावरून ये-जा करणार्यांमध्ये भीती पसरली असून रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी जोर धरत आहे.
अडवत पैशांची केली मागणी
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रावेत-वाल्हेकरवाडी रस्त्यावरील हॉटेल राजवाडा शेजारुन जाणार्या रस्त्यावर निर्जन ठिकाणी वरील तिघे दारू पित बसले होते. यावेळी हॉटेलसाठी नारळ आणण्याकरीता हॉटेल मॅनेजर सत्यरंजन सत्येंद्रकुमार लेंका (सध्या रा. रावेत, मुळगाव ओरीसा) तेथून जात होते. त्याच्यांसोबत हॉटेलचा एक कर्मचारीही होता. यावेळी या तिघांनी लेका यांना अडवून खिशात जे असेल ते गुपचूप काढून दे म्हणत त्याला धमकावले. मी हॉटेलात काम करतो माझ्याकडे काहीच नाही, असे सांगत लेका याने आपली सुटका करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिघांपैकी ठोके याने खिशातून चाकू काढून लेंका याच्या पोटात डाव्या बाजूला भोसकले.
हॉटेल कामगार, पोलिसांचा पाठलाग
या घटनेमुळे घाबरलेल्या लेका याच्या सहकार्याने मदतीसाठी जोरदार आरडाओरडा केला. तेव्हा हॉटेलचे अन्य कामगार तेथे धावत आले. मात्र, तोपर्यंत हल्लेखोरांनी तेथून पळ काढला होता. कर्मचार्यांनी यातील एकाला पाठलाग करून पकडले. याचवेळी रात्रगस्तीवर असलेले देहूरोड पोलिस ठाण्याचे हवालदार सावंत व त्यांचे सहकारी तेथे पोहचले. हल्ला करून पळून जाणारे दोघे त्यांच्या नजरेस पडले त्यांनी चालत्या जीपमधून उडी मारून यातील आणखी एकाला पकडले. त्यांचा तिसरा साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.