पुणे । गायन आणि अभिनय या दोन्हींचा सुरेख मिलाफ असलेले उत्तुंग व्यक्तीमत्त्व म्हणजे बालगंधर्व. बालगंधर्वांनी प्रत्येकाच्या मनावर मोहिनी घातली आहे. त्यांच्याशी कोणीही तुलना करू शकत नाही. कलाकृतींची ओळख, त्यांचे काम सर्वांपर्यंत पोहचले पाहिजे. बालगंधर्वांचे कार्य समाजासमोर आले नाही तर त्यांचे महत्त्व लोकांना कळणार नाही, असे मत केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी रविवारी व्यक्त केले. तसेच लुप्त पावत असलेली संगीत नाटक परंपरा पुढे जायला हवी, अशी अपेक्षा प्रभु यांनी यावेळी व्यक्त केली.
बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिल्या जाणार्या बालगंधर्व गुणगौरव पुरस्काराने सुप्रसिद्ध गायिका बकुळ पंडीत यांना केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 15 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
गंधर्वरंग स्मरणीकेचे प्रकाशन
सुप्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांना देवगंधर्व भास्करबुवा बखले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 10 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी, महापौर मुक्ता टिळक, एच.वाय.टी. इंजिनिअरिंगचे अध्यक्ष कार्यकारी संचालक भोजराज तेली, उपाध्यक्षा अनुराधा राजहंस, सचिव अवंती बायस आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गंधर्वरंग या स्मरणीकेचे प्रकाशन करण्यात आले.
विविध उपक्रमांद्वारे नाट्यसंगीताला झळाळी
भावपूर्णता, आकर्षकता आणि उत्फुतर्ता ही त्रिसुत्री बालगंधर्व त्यांच्या गायन आणि अभियनात नेहमीच अनुभवयाला मिळाली. या स्वर्गीय देणगीद्वारे बालगंधर्वांनी नाट्य संगीताला पूर्णत्वाला नेले. मात्र गेल्या काही वर्षातील सांस्कृतीक सामाजीक आणि अन्य क्षेत्रातील स्थित्यंतरामुळे नाट्यसंगीताकडे असलेला ओढा कमी झाला. अशा परिस्थितीत बालगंधर्व संगीत रसिक मंडळासारख्या संस्था विविध उपक्रमांद्वारे नाट्यसंगीताला झळाळी देण्यासाठी घेत असलेला पुढाकार प्रशंसनीय आहे, असे प्रभू यांनी यावेळी बोलताना सांगितले.
विविध पुरस्कारांचे वितरण
यंदाचा अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार गोव्याच्या आप्पा बाबलो गावकर तर डॉ. सावळो केणी पुरस्कार डोंबीवलीच्या धनंजय पुराणिक यांना देण्यात आला. गोविंद बल्लाळ पुरस्काराने मुंबईच्या शुभदा दादरकर, काकासाहेब खाडिलकर पुरस्कारने पुण्याच्या कविता टिकेकर, खाऊवाले पाटणकर पुरस्काराने गोव्याच्या राया कोरगावकर, रंगसेवा पुरस्काराने पुण्याचे सयाजी शेंडकर आणि गोव्याचे लक्ष्मण म्हांबरे यांना गौरविण्यात आले. 5 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. तसेच द.कृ.लेले पुरस्काराने उल्हास केंजळे, बालकलाकार निर्झरी चिंचाळकर आणि कार्तिकी भालेराव यांना सन्मानित करण्यात आले. यंदाच्या महाराष्ट्र राजय संगीत नाट्य स्पर्धेतील प्रथम क्रमाकांच्या विजेत्या राधाकृष्ण कलामंदिर या संस्थेलाही यावेळी गौरविण्यात आले.