युआयडीएआयचा नागरिकांना इशारा
नवी दिल्ली : तुम्ही तुमच्या आधार कार्डला लॅमिनेशन केले आहे का?, किंवा मग प्लास्टिक स्मार्ट कार्डाच्या रुपात बनवले आहे का? या प्रश्नांची उत्तरे होय अशी असतील तर मग तुमचे आधार कार्ड काही कामाचे नाही असे समजा! असे केल्याने तुमच्या आधार कार्डाचा क्विक रेस्पॉन्स को़ड (क्यूआर कोड) निकामी होणार आहे. युआयडीएआयने ही माहिती प्रसिद्ध केली असून, याबाबत चिंताही व्यक्त केली आहे.
प्लास्टिक आधारकार्डचा क्यूआर कोड चालत नाही!
याबाबत युआयडीएआयने निवेदन प्रसिद्ध केले असून, आधार कार्डला लॅमिनेट केले किंवा त्याचे प्लास्टिक स्मार्ट कार्ड बनवले तर तुमची परवानगी न घेताच तुमची सर्व माहिती चोरीला जाऊ शकते असे सांगत सावधगिरीचा सल्ला दिला आहे. प्लास्टिक किंवा पीव्हीसी आधार स्मार्ट कार्डाची काहीएक गरज नाही. असे केल्याने क्यूआर कोड चालतच नाही. अशा प्रकारच्या अनधिकृत छपाईमुळे क्यूआर कोड निकामी होतो असे युआयडीएआयने म्हटले आहे. शिवाय, आधार स्मार्ट कार्डच्या छपाईसाठी 50 ते 300 रुपयांपर्यंत खर्च येतो आणि तो अवाजवी असल्याचे युआयडीएआयचे म्हणणे आहे. साध्या कागदावर डाउनलोड केलेले आधार किंवा मग मोबाइल आधार कार्ड पूर्णपणे अधिकृत असल्याचे युआयडीएआयचे सीईओ अजय भूषण पांडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
.. तर शिक्षा किंवा दंड होईल!
तुमचे आधार कार्ड जेव्हा तुम्ही लॅमिनेशन किंवा प्लास्टिक कोटिंगसाठी देता तेव्हा तुमच्या आधार कार्डवर असलेल्या क्यू आर कोडचा गैरवापर केला जातो पण तुमच्या लक्षातही येत नाही. क्यू आर कोडद्वारे तुमची खासगी माहिती सार्वजनिक होते. आधार कार्ड चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आले तर तो एक गुन्हा आहे आणि कायद्यात त्यासाठी शिक्षा किंवा दंड भरण्याचीही तरतूद आहे, असेही पांडे यांनी स्पष्ट केले आहे.