फैजपूर। वाघुळदे व्यापारी संकुलासमोर पुलाच्या बाजूचा नाल्याचा मोठा भाग खुला आहे. परिणामी बाजारपेठेत सर्वत्र दुर्गंधी पसरते. एवढेच नव्हे तर शहरातून गेलेल्या राज्यमार्गावर वाढलेले अपघात पाहता नाल्याचा खुला असलेला भाग मोठ्या नुकसानीचे कारण ठरू शकतो. पुलाचे रुंदीकरण करणे किवा नाल्याला बंदिस्त करणे असे दोन पर्याय ही समस्या सोडवण्यासाठी वापरता येवू शकतात.
कचरा साचल्याने सांडपाण्यास अडथळा
बळीराम बापू वाघुळदे संकुल गजबजलेली बाजारपेठ आहे. अंकलेश्वर-बर्हाणपूर मार्गाला लागून असलेले हे संकुल आणि महात्मा गांधी बहुउद्देशीय सभागृहालगत काही फूट अंतरावरून लेंडी नाला वाहतो. राज्यमार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी या नाल्यावर पूल बांधण्यात आला आहे. असे असले तरी पूल आणि व्यापारी संकुल या मधील नाल्याचा बहुतांश भाग खुला आहे. त्यामुळे अनेक व्यावसायीक या नाल्यात कचरा आणून टाकतात. परिणामी सांडपाण्याच्या वाहतुकीस अडथळे येतात. यामुळे तीव्र दुर्गंधी सुटून नाकाला रुमाल लावल्याशिवाय या भागात ये-जा करणे शक्य होत नाही. दुसरीकडे नाल्याच्या उघड्या असलेल्या भागातच गेल्या काही महिन्यांपासून राज्यमार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. दुर्दैवाने एखादे वाहन पुलावरून नाल्याच्या खुल्या भागात कोसळल्यास जीवित हानी होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी बांधकाम विभागाने राज्यमार्गासोबतच वाघुळदे व्यापारी संकुलासमोर पुलाचेदेखील रुंदीकरण करणे अपेक्षित आहे.