लेकींचे बळी थांबवा!

0

मी शीतल व्यंकट वायाळ, चिठ्ठी अशी लिहते की
माझे वडिल मराठा कुणबी समाजात जन्मले असल्यामुळे त्याच्या शेतात सलग पाच वर्षांपासूनच्या नापीकीमुळे आमच्या कुटुंबाची परिस्थीती अत्यंत हालाकीची व नाजूक असून माझ्या दोन बहिणींची लग्न गेटकेन करण्यात आले. परंतु माझं लग्न गेटकेन करण्यासाठी दोन वर्षांपासून बापाची दरिद्री संपत नव्हती.

कुठल्याही बँकेचं किंवा सावकाराचं कर्ज माझ्या बापाला न मिळाल्यामुळे दोन वर्षांपासून माझं लग्न थांबलं होतं. तरी मी माझे माझ्या बापावरील वज कमी करण्यासाठी आणि मराठा समाजातील रुढी, परंपरा, देवानघेवान कमी करण्यासाठी स्वखुशीने आत्महत्या करत आहे. तरी मला व माझ्या कुटुंबाला समाजाने कुठलाही दोष देऊ नये.
शितल वायाळ

शीतलची ही चिठ्ठी. तिनं जशी लिहिली तशी, शब्दाचाही बदल न करता, अगदी पांढरपेशांच्या प्रमाणमराठीत न आणता जशी आहे तशीच मांडली. शीतलनं जे लिहिलं आहे ते सर्वांनाच थोबाडात मारणारं आहे. शेतकर्‍यांना मदतीची गरज काय असे तारे तोडणार्‍यांपासून ते इतिहासातील पराक्रमात रमून वर्तमानात मागे पडलेल्या आणि भविष्यही करपवत चाललेल्या काही कडवट मराठा जात अभिमान्यांपर्यंत सार्‍यांच्याच डोळ्यांत लातूरच्या या लेकीनं झणझणीत अंजन घातलंय.

समाजातील या दोन टोकांच्या दोन प्रवृत्ती आहेत. एक शेतकर्‍यांना कशाला उगाच मदत करायची? कशाला कर्जमाफी द्यायची? त्यांना शेतकरी म्हणजे फुकटच्याला सोकावलेले बनेल टगे वाटतात. दुसर्‍यांच्या पैशानं पंचतारांकित हॉटेलमध्ये पुख्खा झोडायची ज्यांना सवय असते असे अनेक महाभाग या प्रवृत्तीचे आहेत. खरं तर शेतकर्‍यांना बनेल टगे समजणारे हेच खरे बनेल टगे. त्यांना साधं बिलही द्यावं लागत नाही. दिलं तरी त्यासाठी वापरलेला पैसा दुसर्‍याच कुणी तरी दिलेला असतो. त्यामुळे दिली ऑर्डर की पाहिजे ते मिळतं. कधी काही कमी पडत नसतं. पाणीही… अहो मिनरलच काय आता तर फ्लेवर्ड मिळू लागलंय. कॅश देऊन असो की कॅशलेस पैसा मोजला की सारं मिळतं ना. अशा फुकटचंद माजोर्ड्यांना काय कळणार पाणीटंचाई आणि काय कळणार त्यांच्या प्लेटमध्ये वाढला… माफ करा सर्व्ह केला जाणारा मोत्याचा दाणा पिकवणारा शेतकरीच त्याच मोत्याच्या दाण्याला स्वत: मात्र कसा पारखा असतो ते!

शीतलच्या चिठ्ठीतील ‘शेतात सलग पाच वर्षांपासूनच्या नापीकीमुळे आमच्या कुटुंबाची परिस्थीती अत्यंत हालाकीची व नाजूक हे वाक्य शेतकर्‍यांची परिस्थिती कशी करपतेय ते दाखवण्यास पुरेसं आहे. मात्र, लक्षात कोण घेतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत. मला हा माणूस काही तरी करण्याची धडपड करणारा सकारात्मक नेता वाटतो. शेतकरी सक्षमीकरणाची त्यांची भूमिका योग्यच. मात्र, तो दीर्घकालीन इलाज आहे. आवश्यकच. मात्र, तोपर्यंत मरणपंथावर असलेल्या शेतकर्‍यांच्या मोठ्या खर्‍या गरजू वर्गाला कर्जमाफीच्या सलाईनचीही आवश्यकता आहे. उत्तर प्रदेशमधील योगी पॅटर्नचा त्यांनी अभ्यास सुरू केला आहे. अपेक्षा आहे ते शेतकर्‍यांना वाचवतील. कारण शेती सक्षमीकरणासाठी आधी शेतकरी जगणं महत्त्वाचं!’

हे एकीकडे. दुसरीकडे शीतलचा बळी घेणारी समाजातील बुरसटलेली व्यवस्था. मी माझे माझ्या बापावरील वज कमी करण्यासाठी आणि मराठा समाजातील रुढी, परंपरा, देवानघेवान कमी करण्यासाठी स्वखुशीने आत्महत्या करत आहे. हे शीतलचं वाक्य आपल्या लेकींचे बळी घेणार्‍या तिसर्‍या गुन्हेगाराकडे बोट दाखवणारे आहेत. पहिले गुन्हेगार ते नराधम जे कोपर्डीसारख्या घटनांमध्ये वासनांधतेने लेकींचे लचके तोडून हालहाल करून बळी घेतात. दुसरे गुन्हेगार ते जे शेतकर्‍यांना माणूस म्हणून सन्मानानं जगण्याचे हक्क हिरावून घेतात किंवा फक्त स्वत:च्या राजकारणासाठी वापरून घेतात. ज्यामुळे शेतकरी, त्यांच्या लेकींचे असे बळी जातात. तिसरे शेतकी समाजाचा मोठा भाग असणार्‍या मराठा समाजातील हुंडा-मान-पान रुढी-परंपरा. ज्यांच्यामुळे लेकींच्या लग्नात शेतकरी पिचून जातो. या रुढी, परंपरा सर्वात मोठे गुन्हेगार आहेत.

‘लातूरच्या लेकीने या जुनाट बुरसटलेल्या रुढी परंपरा या गुन्हेगारांकडेही आपलं लक्ष वेधलं आहे. समाज कोणताही असो. ज्या समाजात या रुढी असतील त्या समाजाला दुसर्‍या शत्रूंची गरजच नाही. जमीन कमी होत जाते, पण हुंडा मात्र वाढत जातो. शीतलच्या वडिलांनी दोन मुलींची लग्न बहुधा हुंडा देऊन केली नाहीत. त्यांनी कुंकवावर लग्न लावण्याची गेटकेन ही पद्धत वापरली. ते चांगलंच. पण शीतलनं चिठ्ठीत देवान-घेवानचाही उल्लेख केला आहे. हुंडा नाही पण हे ओझंही शेतकरी वधुपित्याचं कंबरडं मोडत असावं. नाहीतर शीतल असं लिहिणार नाही. ती स्पष्ट लिहिते, बापाचं वज कमी करण्यासाठी. लेकी बापाला ओझे वाटत नसतात. वाटू नयेच. पण आपल्या लेकींना ‘त्या’ बापावरील ओझं वाटणं हे आपल्यासाठी कलंकाचं ओझंच!’

मधल्या काळात मराठा क्रांति मोर्चाचा एक अभिमान वाटावा असा सामाजिक प्रयोग झाला. अनेकांनी त्यावेळी मराठा समाजात जात्यंधता वाढल्याचे शोध लावले होते. मुख्यमंत्री ब्राह्मण असल्याने मोर्चे निघत असल्याचे साक्षात्कार अनेकांना झाले होते. मात्र, त्याच मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला नंतरच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयांनी ते साक्षात्कार कसे पूर्वग्रहदूषित होते ते सिद्ध झाले. नाहीतर 30-35 टक्के मतदार एकगठ्ठा विरोधात गेले असते आणि मोर्चामागे आहेत, असा उल्लेख केला जायचा, त्या राष्ट्रवादी काँग्रेसमागे ते मतदार एकगठ्ठा गेले असते तर निवडणुकीचे निकाल वेगळेच असते. ते असो. तो विषय नाही.

मुद्दा क्रांति मोर्चाच्या सामाजिक प्रयोगाचा. शिस्त, संयम, स्वच्छता हे त्रिगुण केवळ मोर्चापुरते नकोत. तसंच लेकींना निवेदन देण्यापुरतं प्रतीकात्मक वापरलं जाणंही नकोच. जिजाऊंचे, सावित्रीबाईंचे, अहिल्यादेवींचे केवळ भाषणापुरतं नाव घ्यायचं नाही. तसे मायभगिनींनीही आता प्रत्यक्षात वागायचं. शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण जसं महत्त्वाचं तशीच समाजात हुंडाबंदी, देवाण-घेवाणींना फाटा आणि सर्वांसाठी शिक्षणही महत्त्वाचंच. समाज कोणताही असो. हे जर झाले नाही तर आपल्याला येणारा काळ माफ करणार नाही. कोपर्डीच्या लेकीचा बळी घेणार्‍या नराधमांना शिक्षा होणारच. मात्र, लातूरच्या लेकीचा बळी घेणार्‍या नराधम रुढी-परंपरांचे काय? त्यांनाही संपवावेच लागेल. तोच खरा न्यायासाठीचा लढा ठरेल. लेकींचे बळी घेणारे नराधम… मग ते वासनांध असो वा बुरसटलेल्या रुढी-परंपरा… कुणीही असो त्यांना संपवणं हीच खरी शिवनीती. तरच शिवछत्रपतींचं नाव घ्यायचा अधिकार!

तुळशीदास भोईटे – 9833794961