लेखक मात्र शब्दांसोबत खेळत नाही : डॉ. वैद्य

0

पुणे । लेखकाच्या मनात श्‍वासांसोबत शब्दांचा रियाज दिवसरात्र सुरू असला पाहिजे. शब्दांसोबत खेळणे गरजेचे आहे. ग.दि.माडगूळकरांना शब्द सरीप्रमाणे सूचत होते. कारण त्यांची शब्दांसोबत बांधिलकी होती. नृत्य करणारा नृत्याचा रियाज करतो, चित्र काढणारा रंगांमध्ये खेळतो, फक्त आपले लेखक मात्र शब्दांसोबत खेळत नाहीत. अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. माधवी वैद्य यांनी व्यक्त केली.

विष्णूजी की रसोई पुणे आणि सिद्धीविनायक पब्लिसिटी नागपूर यांच्या व नागपूरच्या कवयित्री सना पंडित यांच्या चित्रधून या चित्रकाव्य प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. माधवी वैद्य आणि कला मर्मज्ञ व संग्रहक डॉ. तरिता शंकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते व संत साहित्याचे व्यासंगी उल्हासदादा पवार यांनी भूषवले होते. याप्रसंगी भारत सासणे, कवयित्री सना पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांचा सत्कार करण्यात आला.

 भारत सासणे म्हणाले की, चित्र साक्षरता हा प्रकार आपल्या देशातून लुप्त झाला आहे. यावर अनेक दिगज्जांनी आपली मते व्यक्त केली आहेत. कला आणि जीवन यामध्ये चित्र असते. लोकांकडे चित्र पाहण्याची नजर नसल्याने आज चित्र प्रदर्शनाला नागरिक पाठ करताना दिसतात. डॉ. तरिता शंकर म्हणाल्या की, काव्यचित्र प्रदर्शनातील कविता मनाला स्पर्श करून गेल्या आहेत. चित्रांवरून कविता करणे खरतर जिकरीचे काम आहे. मात्र सना या उत्तम कवी असल्याने त्यांना ते चांगल्या पद्धतीने जमले आहे. चित्र आणि कवितांचे समीकरण भन्नाट आहे. सना पंडित यांनी यावेळी आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली. वृषाली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

शब्द चित्रकाव्य हे नवीन परिमाण  डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या की, सध्याचा काळ हा व्हिज्युएल भाषेचा आहे. मात्र, आताचे लेखक टीव्हीला अनुसरून व्यवस्थित लिखाण करत नाहीत. लेखकांना व्हिज्युएल भाषेची ताकद समजली नाही. चित्र आणि शब्दांची सांगड घालणे खूप कठीण असते. लेखकांनी वेगवेगळी माध्यम ओळखली पाहिजे. अभिव्यक्त होण्यासाठी शब्द चित्रकाव्य हे नवीन परिमाण येऊ घातलं आहे. या काव्य चित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने शब्द आणि चित्राची सुंदर मिलाफ पाहायला मिळाला.

चित्र व धूनचा एकसाथ अनुभव उल्हास पवार म्हणाले की, स्वराला पर्यायी शब्द असू शकतो  मात्र धूनची जादू निराळी आहे. कारण डोळे बंद केल्यावर चित्र आणि धून या दोन्ही गोष्टी एकसाथ अनुभवता येतात. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने विविध मार्गातून व्यक्त होत असतो पण काव्य आणि चित्राच्या माध्यमातून व्यक्त होण्याची कला अद्भुत आहे. मोजक्या लोकांना ही कला जमते त्यातील कवयित्री सना पंडित एक असल्याचे पवार यांनी सांगितले.