लेखक, संशोधक प्रा. रामनाथ चव्हाण कालवश

0

पुणे : दीन, दलित आणि भटक्या-विमुक्तांच्या ज्वलंत प्रश्‍नांकडे आपल्या संवेदनशील व परखड लेखणीतून लक्ष वेधणारे दलित चळवळीतील आघाडीचे लेखक-संशोधक व नाटककार प्रा. रामनाथ चव्हाण यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. संशोधनपर लिखाण, नाटक, कादंबरी, कथा, एकांकिका आणि व्यक्तिचित्रे या साहित्यप्रकारांत चव्हाण यांनी मौलिक योगदान दिले आहे. ते 65 वर्षांचे होते. कर्करोगाच्या दीर्घ आजारपणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे पत्नी शीला, मुले सागर व समीर असा परिवार आहे.

प्रा. चव्हाण मराठीतील दस्तावेज
चव्हाण यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांवर सदस्य म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले होते. दलित चळवळीतही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. उत्कृष्ट साहित्यनिर्मितीबद्दल राज्य शासनाच्या सहा पुरस्कारांसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. चव्हाण यांच्या निधनाबद्दल साहित्य क्षेत्रातील, तसेच सामाजिक चळवळीतील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला. ’भटक्या-विमुक्तांची जातपंचायत’ हे पाच खंडात प्रसिद्ध झालेले त्यांचे लिखाण हा मराठीतील महत्त्वाचा दस्तावेज आहे. ’भटक्या-विमुक्तांचे अंतरंग’ हे चव्हाण यांचे अनुभव कथन गाजले. ’दलितांचा राजा डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ’घाणेरीची फुलं’ हे त्यांचे व्यकिचित्रण व माहितीपर लेखन संदर्भांसाठी उपयुक्त ठरते. ’बिनचेहर्‍याची माणसं’, ’वेदनेच्या वाटेवरून’, ’बामनवाडा’, ’गावगाडा काल आणि आज’ हे कथा लेखन, तसेच ’जाती आणि जमाती’ हे सामाजिक लेखन त्यांनी केले. ’पारध’, ’पुन्हा साक्षिपुरम’ ही नाटके आणि ’निळी पहाट’, ’जगण्यासाठी’ या कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. ’जाती व जमाती’ या पुस्तकाचा जपानी भाषेतही अनुवाद झाला आहे.