लेखणीच्या योग्य वापरामुळे समाजाला मिळते दिशा – भानुदास जाधव 

0
तळेगाव दाभाडे : पत्रकारांनी जनजागृती आणि लोककल्याणासाठी आपल्या लेखणीचा वापर केला पाहिजे. असा योग्य वापर केल्यास समाजाला दिशा मिळू शकते, असे प्रतिपादन तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांनी व्यक्त केले. तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी झालेल्या अभिवादन सभेत जाधव बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील), आरोग्य समिती सभापती अरुण भेगडे (पाटील), नगरसेविका शोभा भेगडे, रजनी ठाकूर, भास्कर भेगडे, रवींद्र माने, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील वाळूंज, उपाध्यक्ष मनोहर दाभाडे, जेष्ठ पत्रकार सुरेश साकोळकर, सोनाबा गोपाळे, बबनराव भसे, प्रेस फोटोग्राफार होनप आदीउपस्थित होते.
पत्रकारिता ही अत्यंत कठीण बाब 
यावेळी संतोष दाभाडे म्हणाले की, पत्रकारिता ही अत्यंत कठीण बाब आहे. बातमीपत्र करताना काहींच्या रागाला सामोरे जावे लागते. तसेच काहीजण आनंदी देखील होतात. त्यामुळे अशा परिस्थितीत बातमी द्यावी लागते. नगराध्यक्षा जगनाडे म्हणाल्या की, तळेगाव दाभाडे शहर विकासाच्या जडणघडणीमध्ये पत्रकारांचा मोठा हिस्सा आहे. शहरातील वेळोवेळी केलेल्या विकासकामांचे बातमीद्वारे केलेले कौतुक अधिक कार्य करण्यास प्रेरित करते. यावेळी तळेगाव शहर भाजपाच्यावतीने उपस्थित पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी साकोळकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा आढावा स्पष्ट केला. सूत्रसंचलन मनोहर दाभाडे यांनी केले तर अभार सुनील वाळूंज यांनी मानले.