आयसीएआयतर्फे महिला लेखापालांची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद
पुणे : काळाप्रमाणे सनदी लेखापालांनी (सीए) विकसीत ज्ञान, कौशल्य आणि नवतंत्र आत्मसात करायला हवेत. भविष्यात कृत्रिम बुद्धिमतेमुळे अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत. 2030 पर्यंत बरीच क्षेत्रे स्वयंचलित होतील. त्यात आपले अस्तित्व कायम राहण्यासाठी नीतिमूल्ये, नवीन तंत्रज्ञान, माहिती, सुरक्षितता जपायला हवी. याशिवाय यांत्रिकरणामुळे स्त्री-पुरुष समानताही वाढेल. त्यामुळे महिला आणि पुरुष लेखापाल असे वर्गीकरण करावे लागणार नाही, असे मत दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडियाचे (आयसीसीआय) माजी अध्यक्ष सीए यशोधन काळे यांनी केले.
आयसीसीआय पुणे व पिंपरी-चिंचवड विभाग आणि कमिटी फॉर कपॅसिटी बिल्डिंग ऑफ मेम्बर्स इन प्रॅक्टिस यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सनदी लेखापालांसाठी आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी यशोधन काळे बोलत होते. बाणेर रस्त्यावरील यशदा प्रशिक्षण केंद्रामध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली होती. सीए प्रफुल्ल छाजेड, तरुण घिया, एस. बी. झावरे, सर्वेश जोशी, एस. जी. मुंदडा, आनंद जाखोटिया, अमोद भाटे, ऋता चितळे, रेखा धामणकर, प्राजक्ता चिंचोळकर यांच्यासह इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
क्षमता विकसीत करा
महिला मल्टिटास्किंग असतात. एकाचवेळी त्या घर, कुटुंब, मुले आणि नोकरी-व्यवसाय सांभाळतात. त्यांच्याकडे वेळेचे उत्तम नियोजन, कामातील प्रामाणिकता, संवेदनशीलता असे अनेक गुण असतात. परंतु, त्यांना अनेकदा परंपरा, संस्कृतीच्या नावाखाली पुढे येऊ दिले जात नाही. त्यांना योग्य संधी मिळाली, तर त्या खूप चांगले काम उभारू शकतात. ’वर्क फ्रॉम होम’, ’वर्क रिमोर्टली’ या संकल्पना रुजताहेत. त्यामुळे तशा प्रकारचे ज्ञान व कौशल्य आत्मसात करून महिलांनी आपल्यातील क्षमता विकसीत कराव्यात, असे यशोधन काळे यांनी पुढे सांगितले.
ज्ञानाचे आदानप्रदान होणे गरजेचे
महिला सीएंनी वेगवेगळ्या परिषदांमध्ये सहभागी व्हावे. ज्यातून आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी आणि व्यक्तिमत्व प्रसारासाठी मदत होते. एकमेकांना सहकार्याच्या भूमिकेतून आपण काम केले पाहिजे. ज्ञानाचे आदानप्रदान होणे हे गरजेचे आहे. ’उद्या कसे होईल’ यापेक्षा आज मी काय करू शकते, याचा विचार आपण केला पाहिजे, असे सीए प्रफुल्ल छाजेड यांनी सांगितले.
सीए अधिक सक्षम होण्यासाठी प्रयत्न
आयसीएआय पुणेच्या माध्यमातून सीए अधिक सक्षम व अद्ययावत होण्यासाठी विविध उपक्रम आणि राष्ट्रीय परिषदा घेतल्या जात आहेत. पुणे शाखेच्या पुढाकारातून होणारी ही चौथी राष्ट्रीय परिषद असल्याचे आनंद जाखोटिया यांनी सांगितले. ऋता चितळे यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका सांगितली. प्रिया आगाशे यांनी सूत्रसंचालन तर प्राजक्ता चिंचोळकर यांनी आभार मानले.