किन्हवली । महापारेषण कंपनीविरोधात किन्हवलीत सहा शेतकर्यांनी सुरू केलेल्या उपोषणाची अखेर दुसर्या दिवशी सांगता करण्यात आली. वीज पारेषणच्या अधिकार्यांनी आठ दिवसांत शेतकर्यांच्या शेतातील उच्च दाबाच्या वाहिनीचा टॉवर इतरत्र हलविण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. उपोषणाच्या दुसर्या दिवशी, बुधवारी सकाळीच मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी शेतकर्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. दुपारी शहापूरच्या नायब तहसीलदार कोमल ठाकूर व उच्च दाब वीजवाहिनी प्रकल्पाचे वरिष्ठ अभियंता एस. एन. सूर्यवंशी यांनी उपोषणकर्त्या शेतकर्यांची भेट घेतली व वरिष्ठांशी चर्चा करून टॉवरच्या जागेत बदल करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागून घेतली. आठ दिवसांत शेतकर्यांच्या सोयीप्रमाणे निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन शेतकर्यांना देण्यात आल्यानंतर शेतकर्यांनी ज्येष्ठ पत्रकार अरविंद भानुशाली यांच्या उपस्थितीत सरबत घेऊन उपोषण स्थगित केले.