हडपसर : परतीच्या प्रवासाला निघालेल्या माउलींच्या पालखीने वडकी येथे विसावा घेऊन सायंकाळी साडेपाचला हडपसरमधील बंटर शाळेच्या मैदानात आगमन झाले. हडपसर पंचक्रोशीतील नागरिकांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे स्वागत केले.
बंटर शाळेत रात्री 8 वाजता माउलींच्या पादुकांवर अभिषेक व महापूजा करण्यात आली. नागरिकांकडून वारकर्यांना अन्नदान करण्यात आले. मेडिकोज असोसिएशनही वारकर्यांच्या सेवेसाठी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. पालखी ज्या ठिकाणी विसाव्याला होती त्या ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र महापालिकेने वारकर्यांसाठी काहीच सोय केलेली नव्हती. त्यामध्ये हडपसर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पालिकेला लेखी निवेदन देऊनसुद्धा स्वच्छता, पाण्याचे टँकर, मोबाईल टॉयलेट यांची सोय दिसत नव्हती. तसेच तात्पुरत्या निवार्याची सोय केलेलीही पाहायला मिळाली नसल्याचे पालखीप्रमुख बाळासाहेब चोपदार यांनी सांगितले.
नगरसेवक योगेश ससाणे यांनीही वारंवार संपर्क करून अपूर्ण सुविधांसंदर्भात पाठपुरावा केला मात्र पालिकेने कोणतीही सुविधा पुरवली नाही. पालखी तसेच पालखी सोहळ्याचे 452 दिंड्यांचे विणेकरी व सुमारे तीन हजार वारकरी परतीच्या सोहळ्यात सहभागी होते. ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे पालखी मुक्कामाचे नियोजन हडपसरच्या पंचक्रोशीतील नागरिकांनी तसेच हडपसर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांनी केले होते.